वार्ताहर/कुंभोज
एनआरसी, एनपीआर, सीएए कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी बहुजन वंचित आघाडी कडून आज, संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावातून सर्व व्यवहार बंद ठेवत पाठिंबा देण्यात आला. तर या बंदचे निवेदन बहुजन वंचित आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत कुंभोज यांना देण्यात आले. यावेळी बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावातून फेरी काढून सदर कायद्याच्या विरोधात घोषणा देत हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली.
परिणामी एनआरसी, सीएए, आणि आर्थिक दिवाळखोरीच्या विरोधात विशिष्ट समाजाला हेतुपुरस्कर या कायद्याद्वारे टार्गेट केले जात असून यात गरीब जनता भरडली जाणार आहे. हा कायदा भाजप सरकारने परत घ्यावा या मागणीसाठी समविचारी पक्षांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे. या अनुषंगाने आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंद पाळण्यात आला. या बंदला पाठिंबा देत कुंभोज येथील व्यापारी, शैक्षणिक संस्था, पतसंस्था, दूध संस्था यांनीही आपले व्यवहार बंद ठेवले.
यावेळी बंद शांततेत पार पडण्याचे आवाहन बहुजन वंचित आघाडीच्या वतीने तसेच ग्रामपंचायत कुंभोज यांच्यावतीने करण्यात आले होते. सदर बंदला कुंभोज ग्रामस्थांच्यावतीने चांगला प्रतिसाद मिळाला.