प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यस्तरीय 25 वी रौप्यमहोत्सवी राजर्षी शाहू मॅरेथॉन स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रन फॉर शाहू मॅरेथॉन (सेलिबेटी रन) घेण्यात येणार आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख दि.1 फेब्रुवारी 2020 रोजीपर्यंत असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक स्पर्धकांना नावनोंदणी करता येणार आहे. तसेच शालेय गटासाठी प्रवेश विनामूल्य राहणार आहे. अशी माहिती मॅरेथॉन स्पर्धेचे कार्याध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन 2020 स्पर्धेची तयारी पूर्ण
समता, साक्षरता व क्रीडा विकास हा राजर्षी शाहूंचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी श्री बिनखांबी गणेश मित्र मंडळ आयोजीत 25 व्या रौप्यमहोत्सवी राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन 2020 स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धेत विविध 15 गटात 6 ते 8 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. दि.2 फेब्रुवारी 2020 रोजी होणाऱया मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना 1 लाख 50 हजारची रोख पारितोषिके, ट्रॉफी व मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाला राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन सहभाग सर्टीफिकेट व स्पर्धेचा लोगो असणारा टी शर्ट दिला जाणार आहे. यंदाच्या मॅरेथॉनचे घोषवाक्य ‘शाहू मॅरेथॉनचा ध्यास, शाहूमिल परिसराचा विकास’ हे आहे.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना
स्पर्धा यशस्वी व सुसूत्रपणे पार पाडण्यासाठी पंच कमिटी, नाव नोंदणी समिती, प्रसिध्दी समिती, अंतिम निकाल समिती, वैद्यकीय समिती, अल्पोपहार समिती, पायलटींग समिती आदी विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने कोल्हापूर जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन पार पाडणार आहे. तसेच स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते दिवस-रात्र परीश्रम घेत आहेत.
यांचे मिळाले बहुमोल सहकार्य
स्पर्धेसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ऑल इंडिया महिला फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती, मेनन बेअरींग लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर अरूण आराध्ये, उद्योजक बाळासाहेब कडोलकर, जाधव इंडस्ट्रीज, महाभारत कन्स्ट्रक्शन, गुरूदत्त शुगर, दत्त इंडिया प्रा.लि., रॉकटेक इंजिनिअर्स, टफ कास्टींग्ज, अपना को-ऑप बँक, अर्बन को-ऑप बँक, महालक्ष्मी को-ऑप बँक, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी, एनकेजीएसबी बँक, युनिअन बँक आदींचे बहुमोल सहकार्य मिळाले आहे.
रन फॉर शाहू मॅरेथॉन (सेलिब्रेटी रन)
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी रन फॉर शाहू मॅरेथॉन (सेलिबेटी रन) घेण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूरातील आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, उद्योगपती, नामांकीत खेळाडू तसेच मागील 24 वर्षातील विजेते स्पर्धक सहभागी होणार आहेत. या सेलिब्रेटी रनचा मार्ग शाहू मॅरेथॉन चौक (बिनखांबी गणेश मंदिर), मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, नंगीवली चौक, लाड चौक, खरी कॉर्नरमार्गे बिनखांबी गणेश मंदिरजवळ समाप्त असा असणार आहे. तरी ज्यांना या सेलिब्रेटी दौडमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे. त्यांनी शाहू मॅरेथॉन कार्यालय येथे नाव नोंदणी करून टी-शर्टस् घ्यावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
मॅरेथॉन स्पर्धेची नाव नोंदणी 1 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 पर्यंत
स्पर्धेची नावनोंदणी दि.15 जानेवारी 2020 पासून श्री बिनखांबी गणेश मंदिर येथील शाहू मॅरेथॉन कार्यालयात सुरू झाली आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख दि.1 फेब्रुवारी 2020 रोजीपर्यंत असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. शालेय गटासाठी प्रवेश विनामूल्य राहणार असून स्पर्धेदिवशीही स्पॉट प्रवेश दिला जाणार नाही. याची दक्षता स्पर्धकांनी घ्यावी, असे आवाहन शाहू मॅरेथॉन संयोजन समितीचे कार्याध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, उपकार्याध्यक्ष राजन पाटील, उदयसिंह घोरपडे, सचिव चंद्रकांत झुरळे, मंडळाचे अध्यक्ष किसन भोसले यांनी पत्रकाव्दारे केले आहे.