ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईत होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा जुना झेंडा बदलून त्याऐवजी राजमुद्रा असलेल्या भगव्या झेंडय़ाचे अनावरण केले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
दरम्यान, मनसेच्या हिंदुत्वाच्या वाटचालीवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला आता काही लोकांना पालवी फुटली आहे, असे म्हणत मनसेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर हिंदुह्दयसम्राट म्हणून बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला. बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाही तर, महाराष्ट्राचे देशाचे दैवत आहे. ते कोणात्याही सत्तेवर, पदावर नव्हते. अलेक्झांडर प्रमाणे ते वावरले लोकांना गोळा करुन प्रेरणा दिली आजही शिवसेना त्याच मार्गावरुन पुढे जातेय.
आता काही लोकांना पालवी फुटली आहे, ती फुटू द्या. पण, बाळासाहेबांना आणि शिवसेना यांना तोड नाही. फक्त 23 जानेवारीला नाही तर महाराष्ट्रत आणि देशात बाळासाहेबांचे स्मरण रोज होत असते, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.