उगार खुर्द रेल्वे उड्डाणपुलावरील दुर्घटना : काहीकाळ रेल्वे वाहतूक ठप्प
वार्ताहर/ उगार खुर्द
उगार खुर्द येथील रेल्वे उड्डणपुलावरुन मालवाहू ट्रक खाली कोसळून दोघे जण जागीच ठार झाले. ही दुर्घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात ट्रकचालक मेहबूब बाशा मुल्ला (वय 28 रा. वगलापूर, ता. रामदुर्ग) व क्लिनर मुताप्पा ग्यानप्पा कुरी (वय 20 रा. हळदूर, ता. गुळेदगुड्ड) हे दोघे ठार झाले. या दुर्घटनेनंतर मिरज-बेळगाव मार्गावरील रेल्वेसेवा काहीकाळ विस्कळीत झाली होती.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, जयगडहून जिप्सम घेऊन मालवाहू ट्रक (क्रमांक के. ए. 29 बी. 5344) मिरज-कागवाडहून मंगसुळी उगार खुर्दमार्गे जे. के. फॅक्टरी मुद्दापूर (जि. बागलकोट) कडे निघाला होता. पहाटे उगार खुर्द येथील रेल्वे उड्डाणपुलावरील पश्चिम बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीला ट्रकची जोराची धडक बसली. यानंतर ट्रक खाली रेल्वे रुळावर कोसळला. या अपघातात चालक मेहबूब बाशा मुल्ला व किन्नर मुताप्पा ग्यानप्पा कुरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान खबरदारी घेत सकाळी एका मार्गावरुन बेळगाव-मिरज दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सकाळी 11 वाजता रेल्वे खात्याच्या पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ट्रकमध्ये अडकलेले दोघांचेही मृतदेह बाहेर काढून उगार खुर्द येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले. तेथे विच्छेदन करून सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर घटनेची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
काहीकाळ रेल्वे वाहतूक विस्कळीत
ट्रक पुलावरुन खाली कोसळल्यानंतर झालेल्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. दरम्यान अपघाताची बातमी उगारसह परिसरात वाऱयासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. उगार खुर्द येथे रेल्वेचे दोन रुळ आहेत. यापैकी एका रुळावर ट्रक कोसळला होता. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अन्या एका मार्गावरील रेल्वे वाहतूक काहाकाळ बंद ठेवण्यात आली होती.









