थायलंड ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद, प्रणॉय, श्रीकांतही पराभूत
वृत्तसंस्था/ बँकॉक
भारताची दिग्गज खेळाडू सायना नेहवालसह एचएस प्रणॉय, समीर वर्मा व किदाम्बी श्रीकांत यांचे थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. विशेष म्हणजे, गेल्या दोन स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाहेर होण्याची सायनाची ही तिसरी वेळ ठरली. या पराभवामुळे आगामी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी तिला आता पुढील स्पर्धेची वाट पहावी लागणार आहे.
बुधवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात पाचव्या मानांकित सायनाला डेन्मार्कच्या बिगरमानांकित होजमार्क केरफिल्टने 13-21, 21-13, 15-21 असे नमवले. हा सामना 47 मिनिटे चालला. डेन्मार्कच्या या युवा खेळाडूने पहिला गेम जिंकत दमदार सुरुवात केली होती. पण, अनुभवी सायनाने दुसरा गेम जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱया व निर्णायक गेममध्ये मात्र सायनाकडून चुका झाल्या, याचा फायदा घेत होजमार्कने हा गेम 21-15 असा जिंकत दुसऱया फेरीत प्रवेश केला.
श्रीकांत, प्रणॉयही स्पर्धेबाहेर
पुरुष गटातील सामन्यात भारताचे आशास्थान असलेला किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा व एचएस प्रणॉय यांना पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर जावे लागले. श्रीकांतला इंडोनेशियाच्या शेसर हिरेनने 21-12, 14-21, 11-21 असे हरवले. समीर वर्माला मलेशियाच्या लिजे लीने 21-15, 21-16 असे तर मलेशियाच्या ल्यु डॅरेनने प्रणॉयला 17-21, 22-20, 19-21 असे पराभूत केले.
सायना नेहवाल, समीर वर्मा, प्रणॉय व किदाम्बी श्रीकांत यांच्या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.









