वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश क्रिकेट मंडळाने विंडीजच्या ओटिस गिब्सन यांची नवे वेगवान गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चार्ल लँगेवेल्ट यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
50 वर्षीय गिब्सन हे विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज असून बांगलादेशने त्यांच्याशी दोन वर्षाचा करार केला आहे. इंग्लंड संघासमवेत गोलंदाज प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केली असून विंडीज व दक्षिण आफ्रिका संघांचे प्रमुख प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. येत्या शुक्रवारी बांगलादेशचा पाकिस्तान दौऱयातील पहिला सामना लाहोरमध्ये होणार आहे. गिब्सन यांनी बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये कुमिला वॉरियर्स संघासमवेत काम पेले आहे. बांगलादेश संघ बुधवारी पाककडे रवाना होणार असून 24 ते 27 जानेवारी या कालावधीत तीन सामन्यांची टी-20 मालिका ते लाहोरमध्ये खेळणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये बांगलादेश संघ पुन्हा पाकमध्ये दोनपैकी पहिली कसोटी खेळण्यासाठी जाणार आहे. यातील दुसरी कसोटी एप्रिलमध्ये होणार आहे. या सामन्याच्या दोन दिवस आधी एक वनडे सामनाही ते खेळणार आहेत.
प्रशिक्षक स्टाफमधील अनेकजण पाकिस्तान दौऱयावर जाण्यास नकार दिला असून त्यात फिरकी गोलंदाज प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी, फलंदाज प्रशिक्षक नील मॅकेन्झी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रेयान कूक यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटपटू मुश्फिकुर रहीमनेही सुरक्षिततेच्या कारणास्तव पाक दौऱयावर जाण्यास नकार दिला आहे.









