ऑनलाईन टीम / पुणे :
भारतामधील शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळते. मात्र, विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाकरीता शालेय शिक्षणासोबतच कला, क्रीडा व सांस्कृतिक या क्षेत्रातील ज्ञान व प्राविण्य त्याने मिळविणे गरजेचे आहे. आजची पिढी मोबाईल, टिव्ही आणि संगणकासारख्या अत्याधुनिक साधनांमध्ये अडकली आहे. त्यांना त्यातून बाहेर काढत शालेय शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकासाचे धडे देण्याची आवश्यकता असल्याचे गुजरातच्या माजी मंत्री डॉ.निर्मला वाधवानी यांनी सांगितले.
कराची एज्युकेशन सोसायटीच्या के.ई.एस.गुरुकुल संस्थेच्या बी.टी.साहनी नवीन हिंद ग्रुप ऑफ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तर्फे अल्पबचत भवन येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहयोग फाऊंडेशनचे डॉ.राम जवाहरानी, डॉ.अजित मणियाल, सिंधी साहित्य अकादमीचे डॉ.बलदेव मटलानी, अरुणा जेठवानी, ब्रिगेडियर बंबानी, ललित संगतानी, लेफ्टनंट जनरल दीपक अजवानी, दीपक रामनानी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
डॉ.निर्मला वाधवानी म्हणाल्या, मुलांचे पालक सध्या पैसा कमविण्याच्या मागे लागले आहेत. पालकांनी मुलांना पैशापेक्षा देखील वेळ देण्याची आवश्यकता आहे. वयवर्षे १२ ते १९ मधील मुलांशी संवाद साधल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील. त्याकरीता पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा.
डॉ.राम जवाहरानी म्हणाले, आजची पिढी ही उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. भारत हा विविध भाषा, वेश आणि संस्कृतीने नटलेला देश आहे. देशात नैसर्गिक सौंदर्य मोठया प्रमाणात असले, तरी देखील आपल्यामधील एकजूट हे खरे सौंदर्य आहे. एकतेचा संदेश देत आणि जगाला शांतता पाळण्याचे आवाहन करतो. त्यामुळे प्रत्येक जाती-धर्माचे सण साजरे करीत एकत्रितपणे देशाला पुढे नेऊया, असेही त्यांनी सांगितले.









