महाराष्ट व कर्नाटकातील प्रत्येक दोघांचा समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दहा बालिकांसह 22 जणांना 2019 चा शौर्य पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. ही बालके 12 वेगवेगळय़ा राज्यांमधील आहेत. त्यांच्यात महाराष्ट्रातील व कर्नाटकातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. 15 वर्षीय आदित्य के. या केरळमधील बालकाला प्रतिष्ठेच्या ‘भारत पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. सर्व शौर्यवानांवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती भवनात हा पुस्कार प्रदान कार्यक्रम मंगळवारी झाला.
असामान्य धैर्याचे प्रदर्शन करत समाजाला साहाय्य करणाऱया बालकांना दरवर्षी शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येते. यावेळीही या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या सर्व बालकांनी अनेकांच्या उपयोगी पडत आपल्या साहसाचे प्रत्यंतर दिले आहे.
प्रवाशांचे प्राण वाचविले
भारत पुरस्काराने सन्मानित आदित्य के. याने आपल्या प्रसंगावधानाने 40 बस प्रवाशांचे प्राण आगीतून वाचविले आहेत. ही घटना नेपाळमध्ये भारतीय सीमारेषेपासून 50 किलोमीटर अंतरावर घडली. बसला आग लागल्यावर चालक पळून गेला. पण आदित्यने प्रसंगावधान दाखवत बसची मागची खिडकी फोडून प्रवाशांना वाट करून दिली. त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. ‘मला भारतीय वायु दलात जायचे आहे’ अशी प्रतिक्रिया आदित्यने पुरस्कार घेतल्यानंतर व्यक्त केली.
मित्रांना वाचविले पण…
केरळच्याच मोहम्मद मुहसीन याला अभिमन्यू पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने असामान्य धैर्य दाखवत आपल्या तीन मित्रांना समुद्रात बुडण्यापासून वाचविले. मात्र दुर्दैवाने यात त्याचाच बळी गेला. त्यामुळे त्याला मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुटुंबियांचे संरक्षण केले
काश्मीरमधील मोहिद्दिन मुघल आणि मुदसीर अश्रफ यांनी पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारातून आपल्या कुटुंबियांच्या प्राणांचे संरक्षण केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुटुंबियांचा जीव वाचविला
13 वर्षीय अलैका या मुलीने तिचे कुटुंबिय अपघातात सापडले असताना त्यांचे प्राण वाचविले. तिला पुरस्कार प्रदान केला जात असताना तिच्या सर्व कुटुंबियांनी उभे राहून तिच्या धैर्याचा सन्मान केला.
बिबटय़ापासून भावाला वाचविले
उत्तराखंडच्या 10 वर्षीय राखीने आपल्या 4 वर्षीय भावाची बिबटय़ाच्या तावडीतून सुटका केली. तिला मार्कंडेय पुरस्काराने गौरविण्यात आले. भावाला वाचविताना ती स्वतः गंभीररित्या जखमी झाली होती. मात्र तरीही तिने बिबटय़ाशी संघर्ष थांबविला नाही. अखेर तिला यश मिळाले.
होडीतील प्रवाशांना वाचविले
ओडीशाच्या पूर्णिमा गिरी आणि सबिता गिरी या बालिकांनी होडी बुडाल्यानंतर 12 प्रवाशांचे प्राण वाचविण्यात मोलाचे साहाय्य केले. या दोन्ही बालिकांना ध्रुव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या प्रवास करत असलेली बोट मगरींचे वास्तव्य असणाऱया नदीत बुडाली होती. 10 वर्षीय श्रीमती बद्रा या मुलीला अपघातग्रस्त मैत्रिणीला मोलाचे साहाय्य केल्यामुळे प्रल्हाद पुरस्काराने गौरविण्यात आले. रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या आपल्या मैत्रिणीला तिने वेळीच आधार दिल्याने तिचा जीव वाचला होता.
गौरव गाथा…
याशिवाय आसामचा कमल कृष्ण, छत्तीसगडच्या कांती पैक्रा आणि भुवनेश्वरी निर्मलकर, कर्नाटकाचे आरती शेट आणि व्यंकटेश, महाराष्ट्राचे झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे, मणीपूरचा लौरेनबाम मांगांग, मेघालयचा एव्हरब्लूम नोनग्रुम तर मिझोरामचे लालियानसंगा, कारोलिन आणि व्हेनलालिराट्रेंगा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.









