उपरोक्त शीर्षकावरून वाचकांचा गैरसमज होईल की भावना नामक नाजूक अंगकाठीच्या युवतीवर हा लेख आहे. तसे नाही. नाजूक असो की न-नाजूक, युवती असो की प्रौढ…त्यांच्यावर लेख लिहिणे अस्मादिकांनी सोडले आहे. किंबहुना तमाम वाचकांच्या भावना कमालीच्या नाजूक झाल्याने सतत दुखावल्या जातात आणि त्या जखमांतून निषेधाचे रक्त वाहू लागते. तस्मात विनोदी लिहिणेच सोडायची वेळ आल्याचे अंतरात्म्याला जाणवते आहे.
नेमकं काय झालं, म्हणून विचाराल तर परवा एक मराठी कौटुंबिक मालिका बघत होतो. आता आम्ही आजवर वाचलेल्या शेकडो कथा-कादंबऱया वगैरे साहित्यात दु:खी कुटुंबांचा एक प्रकार पक्का लक्षात राहिला. तो म्हणजे शरीराने एकत्र आलेली, पण मने दुभंगलेली कुटुंबे. पण परवा बघितलेल्या मालिकेत आम्ही एक अद्भूत दु:खी कुटुंब पाहिले आणि हतबुद्ध झालो. त्या कुटुंबातले जोडपे अनेक †िदवस एकमेकांशी मैत्री असलेले. तो आणि ती मनाने जवळ येतात आणि लग्नाचा निर्णय घेतात. लग्न देखील करतात. पण नंतर दोघे म्हणतात, आम्ही मनाने एकत्र आलो तरी शरीरांनी एकत्र यायला वेळ लागणार आहे. हे दोघे वेडसर आहेत की काय? इंडियट्स आहेत की काय? बुद्धय़ांक ढासळलेले मंद आहेत की काय, असे उद्गार तोंडून निघाले. ते ऐकून शेजारी राहणारे सद्गृहस्थ आमच्यावर चिडून म्हणाले, ‘तुम्ही त्या कथेतल्या पात्रांना वाट्टेल ते बोला. पण त्यांचा बुद्धय़ांक वगैरे काढल्यामुळे तमाम मनोरुग्णांविषयीची तुमची अनुदार भावना दिसून येते.’ आणि त्या सद्गृहस्थांनी आमचा शक्मय तेवढा निषेध केला. आता आम्ही खालीलप्रमाणे निश्चय केला आहे,
रस्त्यात चालताना एखाद्याचा चुकून धक्का लागला तर ‘डोळे फुटलेत का?’ असे विचारणार नाही. चार हाका मारूनही एखाद्याने ओ दिली नाही तर ‘कान फुटलेत का रे?’ असे विचारणार नाही. एखाद्याने न पटणारी कल्पना मांडली तर ‘डोकं फिरलंय का?’ असे विचारणार नाही.
परवाच पु.ल. स्वप्नात आले होते. त्यांना विचारले तर त्यांनी त्यांच्या ‘हसवणूक’ पुस्तकातला एक अंश वाचून दाखवला- ‘… एका नाटकात लिहून गेलो की स्थितप्रज्ञ गाढवासारखा असतो. लोक हसले. पण स्थितप्रज्ञांच्या किती धमक्मया याव्यात? वर गाढवांच्या भावना दुखावल्याबद्दल प्राणिदयामंडळाच्या तारा… मी गंभीर वाङ्मयाकडे केव्हा वळलो आहे!’
मी देखील वळेन म्हणतो. पण आमचं गंभीर लेखन छापणार कोण?








