प्रतिनिधी / वारणानगर :
आरळे (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली पायमल, तर उपसरपंचपदी कविता पाटील यांची बिनविरोध निवड होऊन मावळत्या सरपंच, उपसरपंच यांच्या माध्यमातून सुरू झालेले गावातील सत्तेचे महिलाराज कायम राहिले आहे.
ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित पवार यांनी सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. सुप्रिया घाटगे यांनी सरपंच पदाचा व उपसरपंच पदाचा उषा मोरे यांनी राजीनामा दिल्याने आरळेचे सरपंच व उपसरपंचपद रिक्त झाले होते. या दोन जागेसाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदासाठी दोनच अर्ज दाखल झाल्याने दिपाली पायमल यांची सरपंचपदी तर कविता पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाली. २०१५ मध्ये पार पडलेल्या आरळे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार विनय कोरे यांच्या गटाची निर्विवाद सत्ता होती. सर्व विजयी सदस्यांना नेतृत्व संधी प्राप्त करून देण्यासाठी सुप्रिया घाटगे, उषा मोरे यांनी राजीनामा दिला होता. नुतून सरपंच सौ. दिपाली पायमल यांच्या भावी वाटचालीस सौ. सुप्रिया घाटगे यांनी शुभेच्छा दिल्या. दिपाली पायमल यांचा सत्कार माझी जिल्हापरिषद सदस्य सौ. मनिषा घाटगे यांनी तर उपसरपंच सौ. कविता पाटील यांचा सत्कार मावळत्या सरपंच सुप्रिया घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आनंदराव घाटगे, संजय घाटगे, विश्वास पायमल, बाबासो पाटील, संजय लोहार, महादेव घाटगे, राजाराम पायमल, सौ. उषा मोरे, उज्वला पाऊडकर, संगीता पाटील, ग्रामसेवक विश्वास पाटील, तलाठी वडर तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. शिवनाथ मांयदेनी आभार मानले.