ऑनलाईन टीम / सुरत :
सुरतमधील रघुवीर सेलियम मार्केट इमारतीच्या सातव्या मजल्याला भीषण आग लागली आहे. शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तब्बल 40 गाडय़ा दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
सुरतमधील रघुवीर मार्केटची ही दहा मजली इमारत आहे. या 10 मजली इमारतीत कपडय़ाचे मोठे मार्केट आहे. इमारतीच्या सातव्या मजल्याला आज पहाटे चारच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रुप धारण केल्याने आग इतर मजल्यांवरही पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 40 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझविण्याचे काम वेगात सुरू आहे.
या आगीत मोठय़ा प्रमाणात वित्त हानी झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.









