वार्ताहर/ निपाणी
निपाणी शहर व उपनगरांची गेल्या अनेक वर्षांपासून तहान भागविण्याचे काम जवाहर तलाव करत आहे. असा हा तलाव यंदा तुडुंब भरला असून उन्हाळय़ात भासणारी पाणी समस्या दूर झाली आहे. अशा या तलावाचे सध्या नगरोत्थान योजनेतून काम सुरू असून या कामामुळे जवाहर तलाव परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पण लाखोंचा निधी खर्ची घालून सुरू असलेले हे काम दर्जाहीन असल्याने निधीचा दुरुपयोग होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
जवाहर तलाव परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण, नवा जिना, बंधारा पॅचवर्क ही कामे पूर्णत्त्वाला येत आहेत. तसेच कठडय़ाच्या गिलाव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरू असलेले हे गिलाव्याचे काम पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. असे असले तरी हे काम दर्जाहीन होत असल्याची आतापासूनच प्रचिती येत आहे. या दर्जाहीन कामासाठी कंत्राटदारावर कारवाई होणे आवश्यक असताना पालिका अधिकारी व अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त होत आहे.
गेल्या चार महिन्यापूर्वी बंधारा बांधताना उभारलेले पोल फोडल्याचे खापर समाजकंटकावर फोडताना कंत्राटदाराच्या कामाचा दर्जा कोणीच तपासला नाही. मोडतोड झालेले खांब पुन्हा उभारण्याची तसदी न घेता ते जमीनदोस्त करण्यात आले. हे खांब तलावातील पाण्यात टाकून पाणी प्रदूषित करण्याचा प्रताप कंत्राटदाराने केला. पण याकडेही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष करताना कंत्राटदाराची अप्रत्यक्ष पाठराखणच केली आहे. सदर काम निकृष्ट झाल्याची कबुली अधिकारी वर्ग खासगीमध्ये देतात. त्यामुळे जनतेच्या कररुपी निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी तरी या कामाचा दर्जा तपासावा, अशी मागणी होत आहे.









