बेळगावकरांचा विमान प्रवासाकडे कल वाढला
बेळगाव / प्रतिनिधी
देशातील एक महत्त्वाचे विमानतळ म्हणून बेळगावच्या सांबरा विमानतळाची ओळख निर्माण होत आहे. उडान-3 अंतर्गत बेळगावमधील मार्गाची निवड झाल्यामुळे अल्पदराने विमान प्रवास शक्मय झाला आहे. ‘उडेगा आम आदमी’ हे ब्रीद वाक्मय घेऊन सुरू केलेल्या उडान या योजनेमुळे आराम बसच्या दरात विमान प्रवास करण्याची संधी बेळगावच्या प्रवाशांना मिळाली आहे.
बेळगाववरून दिवसभरात बेंगळूरला 4 विमाने, मुंबई-2, हैदराबाद-3, पुणे-1, तिरुपती-1, म्हैसूर-1, अहमदाबाद-1, इंदूर-1 अशा 8 शहरांना जोडण्यात आले आहे. स्टार एअर, स्पाईसजेट, इंडिगो, ट्रुजेट, अलायन्स एअर या 5 कंपन्या बेळगावला सेवा देत आहेत. उडान-3 मध्ये यातील काही मार्गांची निवड झाल्यामुळे देशातील महत्त्वाच्या विमानतळांमध्ये बेळगावचा समावेश झाला आहे.
खासगी बसचालकांना चाप
मुंबई, बेंगळूर, पुणे, हैदराबाद, म्हैसूर या मार्गांवर खासगी बसचालक आपली सेवा देतात. परंतु त्यांच्याकडून मनाप्रमाणे दर आकारले जात असल्यामुळे अनेक वेळा प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती. परंतु आता विमान प्रवासाचे दर कमी झाल्यामुळे खासगी बसचालकांनाही आपले दर कमी करावे लागत आहेत. त्यामुळे या मनमानी कारभाराला आता चाप बसत आहे.









