प्रतिनिधी/ वास्को
भारतातील तिबेटींच्या कोर ग्रुपचे क्षेत्रीय निमंत्रक संदेश मेश्राम उर्फ समतेन येशी यांचे रविवारी वास्कोत आगमन झाले. ते चौथ्या जनजागरण सायकल यात्रेला बाहेर पडलेले असून 1 डिसेंबरला त्यांनी या यात्रेला प्रारंभ केला होता. तिबेटची मुक्ती- भारताची सुरक्षा असा संदेश या सायकल यात्रेवरून तो देत आहे. या यात्रेकरूचे वास्कोतील तिबेटी व्यापाऱयांनी स्वागत केले.
तिबेटीयन यात्रेकरू संदेश मेश्राम यांनी यापूर्वी 2014 साली नागपूर येथून पहिल्या सायकल भ्रमंतीला सुरवात केली होती. या यात्रेत त्यांनी मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरीसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा या पाच राज्यात चार हजार कि.मी. अंतर सायकलवरून पार केले होते. 2016 साली दुसऱया सायकल भ्रमंतीत त्यांनी नागपूर येथून प्रारंभ केला. या भ्रमंतीत त्यांनी नागपूर, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशहून बोध गया, बिहार हे 1200 कि. मी. अंतर सायकलवरून कापले होते.
तिसऱया सायकल भ्रमंतीला 20 ऑक्टोबर 2017 रोजी प्रारंभ केला होता. या यात्रेत त्यांनी बोध गया ते नाथू-ला-पास सिक्कीम हे 1270 कि.मी. अंतर सायकलवरून पूर्ण केले होते. आता चौथ्या यात्रेला बाहेर पडलेले आहेत. या यात्रेत 7500 कि. मी. अंतर ते सायकलवरून पार करणार आहेत. या यात्रे दरम्यान ते देशातील बारा राज्यातून भ्रमंती करतील. हिमाचल प्रदेश येथील मेकलोड गंज धर्मशाळा येथील बौध्द धर्मगुरू दलाई लामा यांच्या पवित्र स्थळावरून या यात्रेला प्रारंभ झालेला असून मुंदगोड कर्नाटक तिबेटींच्या मोठय़ा वसाहतीत या यात्रेची सांगता होणार आहे. 10 मार्चपर्यंत ही यात्रा संपणार आहे. चिनच्या साम्यवादी सरकारी जाचामुळे तिबेटींना कोणत्या परिस्थितीतून जावे लागते याबाबत भारतीय जनतेमध्ये जागृती करण्यासाठी संदेश मेश्राम उर्फ समतेन येशी सायकल भ्रंमती करीत असतात.









