वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
माजी कर्णधार व अनुभवी फिरकीपटू सना मीरला पाकिस्तानच्या टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. पुढील महिन्यात होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सोमवारी पाकच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. अलीकडच्या काळातील खराब कामगिरीमुळे सनाला संघातून वगळण्यात आल्याची माहिती निवड समितीच्या अध्यक्ष उरोज मुमताज यांनी दिली. दरम्यान, पाक संघाच्या नेतृत्वाची धुरा बिसमाह मरुफकडे सोपवण्यात आली आहे. निवड समितीने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱया 15 वर्षीय आयेश नसीम व 16 वर्षीय अरुब शाह यांना संघात स्थान दिले आहे. दरम्यान, पाक संघ 31 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असून दि .7, 9 व 11 फेब्रुवारी रोजी त्यांचे सराव सामने होणार आहेत.
पाकिस्तान महिला टी-20 संघ – बिसमाह मरुफ (कर्णधार), अमीन अन्वर, आलिया रियाज, अनाम अमीन, आयेशा नसीम, दियाना बेग फातिमा, इराम जावेद, जावेरिया खान, मुनीबा अली, निदा दार, सना, ओमानिया सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा नवाज व सईदा शाह.









