प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
नूतन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. तर जि. प. वर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शासनाने अद्याप नियुक्ती न केल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याजवळ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सध्या ते पाच-पाच कार्यभार संभाळत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची पदोन्नतीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजलक्ष्मी यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी शनिवारीच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोडल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला आणि तातडीने कामाला सुरुवात केली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याजवळ सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकलप संचालक आणि मालवण गटविकास अधिकारी असे पाच-पाच अधिकारी पदाचे ते कार्यभार सांभाळत आहेत.









