स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ‘वृत्तपत्र’ हे माध्यम समाजाच्या प्रबोधनासाठी नामी उपयोगी ठरले. तत्कालीन बहुतांशी नेत्यांनी राजकीय कामाच्या व्यापातही वृत्तपत्रे चालवली. त्या काळात तुलनेने निरक्षरता होती. मात्र माणसे जाणकार आणि प्रगल्भ होती. स्वत:ला वाचता येत नसले तरी इतरांकडून वृत्तपत्रे वाचून घ्यायची. आपली ‘समज’ वाढवण्यासाठी लोकांना ‘वाचन’ गरजेचे वाटायचे. कंदिलाच्या प्रकाशात कष्टाने अक्षराला अक्षर जोडून प्रयत्नपूर्वक वाचन करणाऱया पिढीपुढे आपण नतमस्तकच व्हावे. पुढे दृकश्राव्य माध्यमे आली. म्हणता म्हणता आपल्या घरांचा आणि आयुष्याचाही भाग झाली. या माध्यमांचा सुरुवातीचा रोख निखळ मनोरंजनातून प्रबोधनाचा राहिला होता. नंतर या माध्यमांमध्ये स्पर्धा आली. प्रबोधनाची ‘मात्रा’ कमी होत मनोरंजनामध्ये ‘थिल्लरता’ येत गेली. पुढचा कालखंड हा सामाजिक माध्यमांचा. येथे नाव सामाजिक असले तरी प्रकटीकरण आत्ममग्नतेचे-व्यक्तीवादाचे आहे. म्हणायला ‘समूह’ आहे, मामला मात्र ‘आभासी’ आहे. सोशल नेटवर्किंगने खऱया मैत्रीची संकल्पना बदलली आहे. प्रत्यक्ष आयुष्यात मित्र-मैत्रिणी नगण्य वा मर्यादित असणाऱयांना सामाजिक माध्यमांवर अनेक मित्र-मैत्रिणी असतात.
130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱया आपल्या देशात फोनधारकांचा आकडा 90 कोटींपेक्षा अधिक आहे. ‘स्मार्ट फोनद्वारे इंटरनेट वापरून एकमेकांशी जलद संवाद साधू शकणाऱया फोनधारकांच्या संख्येने 50 कोटींचा आकडा केव्हाच ओलांडला आहे. कोणत्यातरी ओळखीचा वा उद्दिष्टांचा आधार घेऊन अनेक गटातटात विभागलेली सामाजिक माध्यमांवरील माणसे आलेला मजकूर अनेकदा पूर्ण न वाचताच पुढे ढकलत असतात. दुसऱयांची भूमिका, विचार शांतपणे समजून न घेता, यथावकाश प्रतिक्रिया देण्याचा संयम न बाळगता, आत्यंतिक तातडीने प्रतिक्रिया देणारी माणसे फोनसारखीच ‘स्मार्ट’ ठरतात. प्रत्यक्षात ती तशी मुळीच नसतात. बातमी दीपिका पदुकोनची असो वा डोनाल्ड ट्रम्पची अशा प्रतिक्रिया ही प्रश्नांबाबतची धारणा आणि माध्यमांचा प्रभाव दर्शविणाऱया असतात. लोकांना वाटते माध्यमांमधला मजकूर खरा असतो. वाचक वा दर्शक आपली तर्कबुद्धी न वापरता बातम्या, मजकूर स्वीकारतात. त्यावर आधारित आपली मते बनवतात आणि खोटय़ा प्रचार-प्रसाराला बळी पडतात.
सर्व माध्यमे मुळात ‘निर्मिती’ असते. माध्यमांचे स्वत:चे एक अर्थकारण आणि राजकारणही आहे. माध्यमांना स्वत:ची विचारसरणी आणि मूल्ये नसली तरी ते ‘वाहक’ म्हणून काम करीत असतात. येथे आशय आणि लय यांचा जवळचा संबंध असतो. जेथे आशय आणि लय जळून येते, तेथील आभासी विश्वाशी तादात्म्य पावून प्रेक्षक-श्रोते माध्यमांमध्ये ‘अर्थ’ शोधतात. यातून माध्यमे ‘वास्तव’ विश्वाला आकार देण्यात यशस्वी ठरतात. गेल्या काही वर्षातील सामाजिक-माध्यमांवरील धुमाकुळ आणि गोंधळाने आपल्याला कोणत्यातरी गटात ढकलले जात आहे. ‘आपण’ आणि ‘ते’ हे ध्रुवीकरण करण्यात दोन्ही बाजूंची माणसे अहमहमिकेने भिडत आहेत.
अफगाणिस्तान, नायजेरिया आणि पाकिस्तान या देशांमध्ये आजही पोलिओच्या विषाणूंचा प्रादुर्भाव आहे. सर्वंकष पोलिओ लसीकरण मोहिमेच्या उद्दिष्टांना खीळ बसवणारी एक खोटी चित्रफित पाकिस्तानमध्ये तयार झाली होती. या खोटय़ा चित्रफितीची (फेक व्हीडिओ) धग महाराष्ट्रातल्या सोलापूर, भिवंडी शहरांपर्यंत येऊन पोहोचली होती. अखेरला जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत हस्तक्षेप करावा लागला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरून हालचाल झाल्यामुळे पाकिस्तानमधल्या पेशावर प्रांतातून चौदा जणांना अटकही करण्यात आली होती. अनेकदा यासारख्या खोटय़ा चित्रफिती मानवतेला गालबोट लावतात. सामाजिक सौहार्दता धोक्मयात आणतात. अफवांमुळे दंगली उसळतात. निरपराध माणसांचा बळी जातो. आपल्या देशातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि भाबडेपणा लक्षात घेता कितीतरी गैरसमजांना-भूलथापांना आपण रोजच बळी पडत असतो. ज्यांना गुंतागुंतीचा मजकूर समजतो, ज्याला बातमीचा मथितार्थ उमगतो किंवा ज्याला माध्यमावरील खरी-बनावट चित्रे-संदेश ओळखता येतात, त्याचे विश्लेषण करायला जमते त्यांना आपण माध्यम साक्षर म्हणू शकतो. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधल्या अनेक देशांमध्ये ‘माध्यम साक्षरता’ हा विषय शालेय स्तरावर शिकवला जातो. अलीकडील ‘नागरिकत्व संशोधन कायदा’ आणि ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ याबाबत झालेल्या निदर्शनांमधील सहभागी बहुतांशी तरुणांना कायद्यातील तरतुदी तर सोडाच कायद्यांची नावेदेखील माहिती नव्हती. माहितीचा स्रोत निव्वळ ‘व्हॉट्स-अप’ असल्याच्या अनेक विसंगती विद्यापीठ जगतातही आहेत. आपण ज्या मुद्यांवर आंदोलन करीत आहोत, त्या कार्यकर्त्यांचे किमान माध्यम प्रशिक्षण राजकीय पक्षांनीही करायला हवे. सामाजिक शास्त्र, नागरिक शास्त्र या विषयांसोबतच एकूणच अभ्यासक्रमात लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी माध्यम साक्षरतेचे प्रशिक्षण गरजेचे झाले आहे. पर्यावरण प्रशिक्षणासारखेच माध्यम प्रशिक्षण हे शिक्षण संस्थांद्वारे आवश्यक कौशल्य म्हणून रुजवायला हवे. माहिती विस्फोटाच्या काळातही, माध्यम प्रशिक्षण हे काही ठरावीक संस्थांपुरतेच मर्यादित राहिले आहे. माध्यम साक्षरता प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना संवेदनशील मजकूर, तटस्थपणे, चिकित्सकपणे वाचता येईल. मजकुराची मीमांसा करता येईल. विद्यार्थ्यांची तौलनिक विचारक्षमता वाढून चिकित्सक वाचन कौशल्यही वाढेल. माध्यमांमध्ये ‘मजकूर’ कसा तयार केला जातो, त्याचा श्रोत्यांवर-प्रेक्षकांवर कसा परिणाम होतो, ते त्याला कसा प्रतिसाद देतात यावर जगभरात अभ्यास सुरू आहे. त्याचबरोबर चीनमधल्या ‘सिचुआन’ प्रांतात निव्वळ फेक व्हीडिओ तयार करण्याचे अनेक कारखानेही फायद्यात चालत आहेत.
खऱया माहितीमुळे किंवा प्रत्यक्ष अनुभव असल्यास, आभासी माध्यमांवरील दिल्या जाणाऱया प्रतिसादापेक्षा प्रत्यक्षातील प्रतिसाद हा वेगळाही ठरू शकतो. प्रत्यक्ष अनुभवाधारित ‘समज’ असल्यास आणि मूल्यांची बैठक ‘पक्की’ असल्यास प्रतिसादाबाबत गोंधळ निर्माण होत नाही. समाज माध्यमांवर जे काही दिसते त्यापेक्षा कितीतरी वेगळे आणि सुंदर जग प्रत्यक्षात अस्तित्वात असते. एखाद्या अनुभवाचे वा विधानाचे सार्वत्रिकीकरण करण्याचा अविवेकी पायंडा समाज माध्यमातून नकळतपणे वाचकांच्या वा श्रोत्यांच्या माथी बिंबवला जातो. माध्यम साक्षर होऊन विवेकी आणि समंजस नागरिक होणे फारसे अवघड नाही. सभ्य नागरी समाजासाठी हे आवश्यक झाले आहे.
डॉ. जगदीश जाधव