150 गुणांच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका : प्रवेशपत्रावर नमूद ‘चुका असलेला प्रश्न रद्द करून ठरणार मेरीट लिस्ट’
दिगंबर वालावलकर / कणकवली:
शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ‘प्रिंटिंग मिस्टेक’चा कहर झाला आहे. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीपर्यंतच्या प्रत्येकी 150 गुणांच्या या प्रश्नपत्रिकेत एक, दोन नव्हे, तर असंख्य चुका राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आल्या आहेत. या चुकांमुळे परीक्षार्थी मात्र गोंधळून गेले.
रविवारी सिंधुदुर्गात ही परीक्षा घेण्यात आली. पहिली ते पाचवीसाठीच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मध्ये प्रश्न क्रमांक 54 मध्ये वाक्यातील अधारेखित शब्दाची जात ओळखा असा प्रश्न देत त्या खाली पर्यायी शब्द देण्यात आले. मात्र त्या शब्दांना ‘अधोरेखितच’ करण्यात आले नव्हते. त्यामुळे अधोरेखित प्रश्नाची जात कशी ओळखावी, असा प्रश्न परीक्षार्थींना पडला. ‘श्रद्धांजली’मधील एकूण वर्ण किती, असा प्रश्न गरजेचा असताना एकूण शब्दाऐवजी ‘राकूण’ हा शब्द वापरण्यात आला. इंग्रजी विभागासाठी देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्र. 6 मध्ये उत्तरासाठी ए, बी, सी, ‘बी’ पैकी एक पर्याय निवडा असे म्हटले होते. मात्र पर्यायांमध्ये ए, बी, सी, ‘डी’ असे पर्याय देण्यात आले.
प्रत्येक प्रश्नाला एक गुण
या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला एक गुण देण्यात आला होता. उत्तराचे पर्यायच चुकीचे दिल्याने बहुसंख्य परीक्षार्थींना गुण गमावण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सहावी ते आठवीपर्यंतच्या प्रश्नपत्रिका क्र. 2 मध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विभागात प्रश्न क्रमांक 65 मध्ये आहेत ऐवजी ‘अहिन’ शब्दाचा वापर करण्यात आला, तर प्रश्न क्रमांक 74 मध्ये वयाच्या तिसऱया वर्षापर्यंत असा शब्द आवश्यक असताना त्या जागी वयाच्या ‘निसन्या’ ‘वर्षापर्यंन’ असा उल्लेख होता. याच प्रश्नात मज्जासंस्थेचा विकास झपाटय़ाने होत असल्याने असे वाक्य आवश्यक असताना ‘झपाय्याने’ असा शब्द वापरण्यात आला आहे.
शब्दांच्या त्रुटींनीच भरली प्रश्नपत्रिका
प्रश्न क्रमांक 75 मध्ये शैशवावस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या ‘कारकशवणी’ असे वाक्य उल्लेख करण्यात आले आहे. मात्र हे वाक्य कारकशक्ती असे आवश्यक होते. प्रश्न क्र. 76 मध्ये प्रश्नाच्या पर्यायात बेशुद्ध ऐवजी ‘वेशुद्ध’ व होतात शब्दा ऐवजी ‘होनात’ असे शब्द वापरण्यात आले आहेत. प्रश्न क्रमांक 78 मध्ये वादक, गायक, नर्तक इ. कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळावेगळा आनंद देतात, असे वाक्य नमूद करण्याऐवजी ‘आगळाविगळा’ व ‘देनान’, ‘नर्त’ या शब्दांचा घोळ करण्यात आला आहे. 79 क्रमांकाच्या प्रश्नात शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी या वाक्याऐवजी ‘ढिकाणी’ अशा शब्द वापरण्यात आला आहे. याच प्रश्नाच्या 3 क्रमांकाच्या पयार्यात विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास या ऐवजी ‘करव्यास’ अशी चूक करण्यात आली आहे. 80 क्रमांकाच्या प्रश्नात आपल्याला अनुकुल व सोईस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देणे ऐवजी ‘ककन’ देणे व जे हवे ते मिळाले पाहिजे असे गृहित धरून चालतो या ऐवजी ‘गृहिन’ व ‘धकन’ असे शब्द वापरण्यात आले आहेत.

चुका गृहित धरूनच काढली प्रश्नपत्रिका
टीईटी परीक्षा दिलेले बेरोजगार एम. ए., बी. एड परीक्षार्थी नरेंद्रकुमार चव्हाण यांनी पुणे परीक्षा मंडळाच्या या प्रिंटिंग मिस्टेकच्या घोळाबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, परीक्षा मंडळाच्या चुकांचा त्रास परीक्षार्थींनी का सहन करावा? या मिस्टेकमुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीपासूनच प्रिटिंग मिस्टेकचा घोळ असल्याने पुढील प्रश्नांची उत्तरे देताना गोंधळाची स्थिती निर्माण झाली. परीक्षा मंडळाकडून देण्यात आलेल्या परीक्षा प्रवेशपत्रावर म्हटले आहे, ‘जर प्रश्नात चुका असतील, तर तो प्रश्न रद्द करून उरलेल्या प्रश्नांवर आधारित मेरीट लिस्ट ठरविली जाईल. हा प्रकार म्हणजे चुका होणार हे गृहित धरूनच प्रश्नपत्रिका काढण्यात आली.









