सिंधुदुर्ग /प्रतिनिधी
लिहिलं की लगेच छापलं जावं ही वृत्ती कवीने सोडून दिली पाहिजे. कोणताही खरा कवी सामान्य माणसाच्याच बाजूने कायम राहतो.माणसाचं चैतन्य जिवंत ठेवण्याचे काम कवितेतून झालं पाहिजे. आवानओल प्रतिष्ठान गेली दहा वर्ष अशा सामान्य माणसांच्या बाजूने रहाणाऱ्या कवींना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवून आपलं सामाजिक कर्तव्य पार पाडत असून त्यातून मराठी साहित्य चळवळीत आपलं स्वतःचं असं योगदान दिलं आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री, समीक्षक , भाषांतरकार प्रा. डॉ. शोभा नाईक ( बेळगांव) यांनी कणकवली येथे केले.
आवानओल प्रतिष्ठानचा दहावा कविवर्य वसंत सावंत स्मृति उगवाई काव्य उत्सव शहरातील हॉटेल गोकुळलधामच्या युनिक अकॅडमी सभागृहात डॉ. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाला. जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष सिताराम कुडतरकर यांनी उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमात जुन्नर पुणे येथील कवी अनिल साबळे यांना त्यांच्या टाहोरा काव्यसंग्रहासाठी कविवर्य वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार तर मालवणी कवी प्रा. नामदेव गवळी यांना त्यांच्या ‘भातलंय’ काव्यसंग्रहासाठी कविवर्य द. भा. धामणस्कर काव्य पुरस्कार डॉ. नाईक यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर तसेच कवयित्री कल्पना मलये यांचा डॉ. नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कवी नारायण लाळे, आवानओल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय कांडर, कार्यवाह विनायक सापळे, संस्था पदाधिकारी एड. विलास परब, अच्युत देसाई, कल्पना मलये, राजेश कदम, मोहन कुंभार, किशोर कदम, सत्यवान साटम आदी उपस्थित होते.
डॉ नाईक म्हणाल्या, माणसाचं विस्कळीत जगणं योग्य वाटेवर आणण्याचं काम कवीच असतं. सामान्य माणसाच्या मनातील घुसमटीला मोकळं होण्यासाठीच कवी आपले शब्द खर्च करत असतो. माणसाचं चैतन्य जीवंत ठेवण्यासाठी कवीला आपल्या शब्दांच्या कसोटीवर उतरावं लागतं. अशी एखादी तरी कविता आयुष्यात प्रत्येक कवीला लिहीत आली पाहिजे. लिहिलं की लगेच छापलं जावं ही वृत्ती कवीने सोडून दिली पाहिजे. सातत्याच्या प्रसिद्धीपासून दूर राहणारा कवीच सामान्य माणसाच्या बाजूने असतो. समाजाच्या तीव्र वेदना कवीच्या मनात आस्था धारण करत असतात. मात्र प्रसिद्धी डोक्यात असणारा कवी सतत स्वतःभोवती फिरत राहतो. अशा प्रसिद्धीपासून नव्या कवींनी दूर राहायला हवे.
श्री. कुडतकर म्हणाले, आवानओल प्रतिष्ठान सारख्या मोठ्या संस्थेच्या दहाव्या काव्य उत्सवाला मला उद्घाटनाला म्हणून बोलवणे हा माझा सन्मान समजतो. कविवर्य वसंत सावंत यांच्याशी माझे स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या पत्नी नीलिमा सावंत यांचा मी विद्यार्थी.या प्रतिष्ठानने खूप मोठं साहित्यिक काम केलेल आहे. प्रतिष्ठामुळे मराठीतील चांगल्या कवींना गेली दहा वर्षे पुरस्कार देऊन गौरविल्यामुळे चांगली गुणवत्ता असणारे कवी जाणकार रसिकांसमोर आले. महाराष्ट्रातल्या दूरदूरच्या भागातील मोठ्या कवींना इथे बोलावून त्यांच्या कवितांचा आस्वाद इथल्या रसिकांना देण्याचं काम आवानओलने केले आहे.
यावेळी पुरस्कार विजेते कवी अनिल साबळे, प्रा नामदेव गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कवी नारायण लाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात विविध अनुभवविश्व मांडणाऱ्या कविता कवींनी सादर केल्या. प्रास्ताविक अजय कांडर यांनी तर सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले.आभार विनायक साबळे यांनी मानले.