प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून काही उपाययोजना कराव्यात. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असे मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
बेळगावमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. तरीही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, ‘मी येथून गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बेळगावची परिस्थिती आणि लोकांच्या भावना सांगणार आहे. बेळगावचा विषय न्यायप्रविष्ठ असून तारखांवर तारखा पडत आहेत. आता एकदा प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्याच्यावर राजकीय भाष्य करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी खटला लढण्यासाठी हरिश साळवे यांची नियुक्ती केली आहे. ते जगातील सर्वोत्कृष्ट वकील असल्याचे राऊत म्हणाले.
‘न्यायालयाच्या जो निकाल लागेल तो लागेल. मात्र, सध्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन या विषयावर चर्चा झाली पाहिजे. न्यायालयाचा जो निकाल लागेल त्याच्यात किती पिढय़ा अजून जातील ते सांगता येत नाही. मी सतत सांगेन की, दोन मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चर्चा करुन मार्ग काढावा. या देशामध्ये लोकशाही आहे. शेवटी चर्चेतून विषय सुटावा. हा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विणेचे शिलेदार होते. त्यामुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शरद पवार यांचीही उपस्थिती गरजेची राहील. विरोधी पक्षनेते असताना शरद पवार यांनी लाठय़ा खाललेल्या आहेत. छगन भुजबळ, एकनाथ शिंदे असे अनेक लोक या आंदोलनात होते. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची तातडीने बैठक व्हायला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.









