तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी
आपल्या संपूर्ण आयुष्याचे होमहवन करून समृध्द भारत बनविण्यासाठी जे स्वप्न, जे विचार स्वामी विवेकानंद यांनी मांडले. त्या विचारांच्या मार्गदर्शनावर आज देशाची वाटचाल सुरू असून या नेतृत्वाची धुरा नरेंद्र मोदी सांभाळत असताना मागील सहा वर्षात त्यांच्या निर्णय क्षमतेतून दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना राजर्षी पदवी योग्य असून त्यावर आधारित असलेले हे ग्रंथ सकारात्मक जागृतीचे शाश्वत मूल्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अरुण करमरकर यांनी केले.
हुतात्मा स्मृती मंदिर येथे रविवारी सायंकाळी जटायु अक्षरसेवा यांच्यावतीने ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी या ग्रंथाचे प्रकाशन व अरुण करमरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी करमकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. जयसिध्देश्वर महाराज, संतोष जाधव, श्रीनिवास बुर्रा उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा पूजन करण्यात आली.
ग्रंथाची पावित्रता सांगताना खा. जयसिध्देश्वर महाराज म्हणाले की, हे ग्रंथ इतके पवित्र आहे की, हे ग्रंथ वाचताना हात धुवून शुध्द होऊनच वाचन केले पाहिजे. त्या नरेंद्रांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा नरेंद्र आला आहे. देशाचा विकास हा एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले कार्य करीत आहेत. या कार्यात जनतेचा मोलाचा योगदान असल्याचेही खा. जयसिध्देश्वर महाराज म्हणाले.
अरुण करमरकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, अनेकांच्या योगदानातून समूह नेतृत्वातून या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. ब्रह्मर्षी व राजर्षी ही विशेषण अतिशयोक्ती नसून त्यांच्या कार्याच्या व कर्तृत्वाच्या आधारावर दिली गेली आहेत. हे जाणून घेण्यासाठी इतिहासाची पार्श्वभूमी आणि वर्तमानातील भारत याचा अभ्यास केला पाहिजे. स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी 175 वर्षापूर्वी भाकित केले होते, की 175 वर्षानंतर देशाचे वैभव, समृध्दी परत मिळणार आहे. या भाकितेला 2013 ला 175 वर्ष पूर्ण झाले. मागील सहा वर्षांपासून देशात सुरू असलेल्या घडामोडी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील निर्णयक्षमता यातून स्पष्ट होतात.
लोकशाहीत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी लोकप्रिय निर्णय घेणाऱयांवर राजकारण्यांचा कल असतो. मात्र नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामध्ये लोकप्रियतेला नाही तर देशहिताला प्राधान्य दिले आहे. अप्रियतेचे जोखीम स्विकारत हे सरकार सत्तेवर आले आहे. लोकभावनेशी एकरुप होत, संवाद साधण्याचा अभिनव मार्ग मन की बात हा उपक्रम कायम ठेवत जनतेशी आपुलकीची नाळ बांधली गेली आहे, असेही करमरकर यांनी मोदींच्या कार्याची सुस्पष्टता मांडली.
तसेच ग्रंथासाठी योगदान लाभल्यामुळे ऍड. मंजुनाथ कक्कळमेली, अरविंद जोशी, डॉ. शिवरत्न शेटे, डॉ. रवींद्र पाठक, डॉ. नंदकुमार व छाया रघोजी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दाराम पाटील, सागर सुरवसे यांनी केले. आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले.
देश विदेशातील या 31 लेखकांचे योगदान
डेव्हिड फ्रॉले, आर. व्ही. एस. मणी, तुषार दामगुडे, प्रॅन्कॉइस गोटियर, उदय माहूरकर, तरुण विजय, रमेश पतंगे, विवेक घळसासी, रवींद्र गोळे, अभिलाष खांडेकर, हेमंत महाजन, भाऊ तोरसेकर, यमाजी मालकर, ओंकार दाभाडकर, प्रमोद डोरले, अरुण करमरकर, वेणू धिंगरा, एच. श्रीकांत, अरविंद जोशी, सिध्दाराम पाटील, राकेश शेट्टी, ऍड. के. मंजुनाथ, मनोहर कुलकर्णी, स्वर्णलता भिशीकर, प्रसाद चिकसे, जयेश मेस्त्राr, वा.ना. उत्पात, मिलिंद कांबळे, लखेश चंद्रवंशी, डॉ. अभिराम दीक्षित.