ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नवा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी रयत क्रांती संघटनेच्या सर्व कार्यकारिणी समिती बरखास्त केल्या आहेत. त्याबाबतची घोषणाही त्यांनी औरंगाबादेत केली.
नव्या पक्षाचे नाव आणि झेंडा जनतेनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सुचवावा, असेही सदाभाऊ यांनी म्हटले आहे. येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौरा करणार आहे. तर नव्या पक्षाचे एप्रिलमध्ये पहिले अधिवेशन ते घेणार आहेत.
औरंगाबादेतील गुलाब पुष्प मंगल कार्यालयात शनिवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खोत यांनी ही माहिती दिली. खोत म्हणाले, कष्टकरी आणि श्रमजीवी लोकांना एकत्रित संघटीत करून त्यांना न्याय देण्यासाठी माझा नवीन पक्ष काम करणार आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱयांसाठी पक्षाची दारे खुली आहेत.
तसेच शेतकरी कर्जमाफीचा मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला. फडणवीस सरकारच्या काळातील कर्जमाफी योजनेत त्रुटी आहेत. मराठवाडा, विदर्भातील 60 टक्के बँक खाती लिंक नाहीत. त्यामुळे 40 टक्के शेतकऱयांनाच कर्जमाफी मिळणार आहे.