17 व्या मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबई सज्ज : ठिकठिकाणी चोख बंदोबस्त
प्रतिनिधी/ मुंबई
आज मुंबईकर रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून आपल्या निरोगी आरोग्यासाठी आणि सामाजिक जनजागफतीचा संदेश घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे. निमित्त असेल ते ‘17 व्या टाटा मुंबई मॅरेथॉन’चे. त्यासाठी महिन्याभरापासून सुरू असलेला स्पर्धकांचा सराव आता अंतिम टप्प्यात आला असून स्पर्धेसाठी मुंबई पालिकेसह सर्व प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणाही सज्ज असून स्पर्धकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी विविध वाहतूक बदल आणि अतिरिक्त रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत.
प्रोपॅम इंटरनॅशनल प्रमोट करत असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास 55 हजारहून अधिक स्पर्धक सहभाग नोंदवला आहे. त्यात फुल मॅरेथॉनमध्ये 9660 स्पर्धक तर अर्धमॅरेथॉन 15260 स्पर्धक, ड्रीम रनमध्ये 19707 स्पर्धक धावणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉन स्पर्धेत 1022 स्पर्धक सहभागी होणार आहेत. तर दिव्यांगाच्या स्पर्धेत 1596 स्पर्धक सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनसाठी दक्षिण-मध्य मुंबईतील बहुतांश सर्वच प्रमुख मार्ग रविवारी पहाटे 3 पासून वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. स्पर्धकांना कोणतीही इजा अथवा वैद्यकीय मदत लागल्यास 12 वैद्यकीय थांबे, 11 रुग्णवाहिका, 600 वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एकूण 4 लाख 20 हजार यूएस डॉलर किमतीची बक्षीस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे 45 हजार, 25 हजार आणि 17 हजार डॉलरचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात यणार आहेत. अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे 5, 4, व 3 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.
इथियोपियाचे वर्चस्व राखेल का ?
मुख्य मॅरेथॉन एलिट गटात ऍबशेरोकडे मुंबई मॅरेथॉनचा संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाते. त्यामुळे इथियोपियाचे यंदाच्या मॅरेथॉनवर वर्चस्व अवाधित राहिल का याकडे सगळय़ांचे लक्ष असणार आहे. इथियोपियाच्या आयले ऍबशेरो याची 2 तास 4 मिनिट 23 सेकंदाची वेळ सर्वोत्तम असून इथियोपियाच्याच अबेरा कुमा याची 2 तास 5 मिनिटे 50 सेकंदाची सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र, प्रत्यक्षात एलिट धावपटूंची कामगिरी कशी होते. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महिलांच्या गटात अमाने बेरिसो (इथिओपिया), वर्कनेस अलेमू (इथिओपिया), रोदाह जेपकोरिर (केनिया) आणि शैला जेरोटिच (केनिया) यांच्यात झुंज रंगेल.
रशपाल सिंगकडे नजर
भारतीय धावपटूंमध्ये रशपाल सिंगकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय एलिट धावपटूंमध्ये त्याने 2.19.19 अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली असून त्याला राहुल पाल (2.21.41) आणि श्रीनू बुगाथा (2.23.56) यांचे कडवे आव्हान मिळणार आहे. महिलांमध्ये ऑलिम्पियन सुधा सिंग संभाव्य विजेती मानली जात असून तिला महाराष्ट्राच्या ज्योती गवतेपासून आव्हान मिळू शकते.









