विज्ञान असो वा तंत्रज्ञान, हे दुधारी शस्त्रासारखे आहे. मानवी विकासासाठी त्याचा आपण सदुपयोग करून घ्यायला हवा. पण त्याचा दुरुपयोगच आपल्याला जास्त दिसून येतो. आज एका वर्षाच्या लेकराच्या हातात मोबाईल देत आहोत. त्याच्या कोवळय़ा डोळय़ावर आणि मेंदूवर काय विपरीत परिणाम होत असेल,याचासुद्धा विचार आपण करत नाही. ऑफिसमध्ये कॉम्प्युटरचा वापर हा अनिवार्य आणि हिताचा आहे परंतु सोशल मिडियामध्ये व्हॉट्सऍप,फेसबुक यावर तरुणांचा किती वेळ वाया जातो! तरुणांची सर्व शक्ती व वेळ हा यातच जातो आहे.
पूर्वीच्या काळी सकाळ ही 4 ते 5 च्या दरम्यान व्हायची. घरातील स्त्रीपासून तर बाकी सर्व आबालवृद्धही सूर्योदयापूर्वीच उठायचे. स्वच्छ,निरोगी,शुद्ध हवा सगळय़ांना मिळायची आणि सकाळच्या सर्व कामातून सगळय़ांना योग्य तो व्यायाम आपोआपच व्हायचा. पूर्वी सकाळी शौचास बाहेर जाणे, हासुद्धा नैसर्गिकपणे मॉर्निंग वॉक व्हायचा. आणि आज यंत्राचा वापर इतका वाढला की,चार पावलेसुद्धा आजकालची मुलंमुलीच नाहीतर स्त्रियासुद्धा बाइकचाच वापर करत आहेत. घरात वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, ओव्हन या सर्व यंत्राच्या वापरामुळे लठ्ठपणा ही घराघरातील आजची मुख्य समस्या बनली आहे. तसेच आजची पिढी अतिशय कमी वयातच मधुमेह, रक्तदाब अशा आजाराला बळी पडलेली दिसत आहे. प्लास्टिकचा वापरही इतका वाढला की, कॅन्सरसारखा आजार तर तीन घरापैकी एका घरात आढळतो.
प्रदूषणात वाढ
आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आजूबाजूची हवा, पाणी, माती यात भयानक असे प्रदूषण वाढले आहे. आज ग्रामीण भागातील लोकसुद्धा वॉटर फिल्टरचेच पाणी पिताना आढळून येतात. आपल्या शरीराला मिळणारे क्षार आपण असे कमी करून हाडांचा ठिसूळपणा करून घेतला. आज तरुणाईतील व्यसनाचे वाढते प्रमाण हाही एक चिंतेचा विषय आहे. आजचे व्यसन ही तरुणाईची फॅशन झाली आहे. आणि याला आवर घालण्यात आजकालचे पालक असोत अथवा शिक्षक हे हतबल ठरले आहेत. त्यात आपल्याला विशेषतः शहरातील लोकांना मिळणारा भाजीपाला,फळे हीसुद्धा रासायनिक खतांचा, औषधींपासून, पावडरपासून पिकवलेली मिळत आहेत. पण आजची मुलंमुली ही इंटरनेटवर रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी दहा वाजेपर्यंत झोपतात. घरचे जेवण घेण्यापेक्षा सकाळपासूनच फास्टफूडवर नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत दिवस संपतो. शीतपेयांचा वापरही अतिप्रमाणात वाढलेला आहे. याचे व्हायचे ते दुष्परिणाम दृश्यरूपात आहेतच.
निकोप संगोपन कठीण
आज माणूस भौतिक सुखाच्या अधीन झाल्याने झटपट पैसा कसा कमावता येईल, यासाठी तो प्रयत्न करतो आहे. त्यापायी मानसिक स्वास्थ्यही तो गमावून बसला आहे. आजचा काळ म्हणत घरातील थोरामोठय़ांचा आदर, प्रेम या बाबी क्षुल्लक ठरत आहेत. चौकोनीच काय पण त्याही पुढे जाऊन आज त्रिकोणी कुटुंबपद्धती आली. त्यातूनच वृद्धाश्रम आणि पाळणाघर यांचे नको तितके पेव फुटले आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे एक किंवा दोनच लेकरांचे निकोप संगोपन करणे कठीण होऊन बसले आहे. पालकच आपल्या लेकरांच्या मन:स्वास्थ्याला जपायचे म्हणून लेकरानाच भिऊन रहात आहे. माणूस माणसाच्याच प्रेमाला पारखा होत चालला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ वाचवायचा असे आपण म्हणतो, तेव्हा वाचलेला वेळ आपण कोठे वापरत आहोत? या वेळातून आपण ना समाजविकास साधत ना आत्मविकास! चिडचिड,पाल्यांकडून अवास्तव अपेक्षा, पाल्यांचा उद्धटपणा, यात आईवडिलांची कुचंबणा! मग एवढे धावायचे तरी कशासाठी? हे सर्व पाहत, बदलत्या जीवनशैलीचा मानवी जीवनावर किती विपरीत परिणाम होतो, हे सुज्ञास सांगणे न लगे!









