बेळगाव / प्रतिनिधी
सीसीए व एनआरसी या कायद्यांमुळे सध्या सर्वत्र देशात गोंधळ माजला आहे. परंतु कोणताही अभ्यास न करता केवळ विरोधाला विरोध म्हणून गोंधळ घातला जात आहे. हा कायदा कोणत्याही धर्म किंवा जातीविरोधात नाही. त्याचबरोबर कोणत्याही अल्पसंख्याक समाजाला त्रास देणार नाही. देशात सुरक्षेच्या कारणास्तव काही कायदे करावे लागतात. त्यातील हा एक कायदा आहे. त्यामुळे मी या कायद्याचे समर्थन करतो, असे विचार बिहार-गया येथील बौद्ध धर्मगुरु भंते तिस्सावरो यांनी मांडले.
भंते तिस्सावरो निपाणी येथे होणाऱया साहित्य संमेलनासाठी बेळगावमध्ये आले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले व राहुल लिमये यांच्या आग्रहाखातर ते या संमेलनामध्ये बुद्ध साहित्य यावर मार्गदर्शन करणार होते. परंतु काही कारणास्तव हे संमेलन रद्द करण्यात आल्यामुळे त्यांनी शुक्रवारी बेळगाव शहराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी एनआरसी व सीसीएबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
आपला देश काही धर्मशाळा नाही. ज्याप्रकारे एखादे प्रमाणपत्र काढताना आपली प्राथमिक माहिती द्यावी लागते, त्याचप्रकारे या कायद्याद्वारे आपल्याला माहिती द्यावी लागणार आहे. विकासापासून लोकांना भरकटविण्यासाठी काही शक्तींचा हा प्रयत्न आहे. देशभरात या कायद्याविरोधात मोर्चे काढण्यात आले. परंतु या मोर्चांना आर्थिक मदत कोणी पुरविली, याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या व्यक्तींना या कायद्याविषयी तिळमात्र माहिती नाही, असे लोक याला विरोध करीत आहेत. दिशाहीन, विचारहीन व्यक्ती याला विरोध करीत आहेत. त्यामुळे सुशिक्षित लोकांनी या कायद्याचा अभ्यास करून त्यांची जागृती समाजामध्ये करावी, असे आवाहनही भंतेजींनी केले.









