विजापूर/वार्ताहर
अंत्यसंस्कारासाठी जाणारी ट्रक्टर उलटल्याने 15 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवार 17 रोजी दुपारी निडगुंदी तालुक्यातील होळेमसूती गावाजवळ घडली. यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना बागलकोट येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे समजू शकली नाहीत.
याबाबत समजलेली माहिती अशी, यल्लम्मन बुदिहाळ येथल काहीजण शुक्रवारी दुपारी ट्रक्टरने मुद्देबिहाळ तालुक्यातील सिद्धापूर येथे अंत्यसंस्कारासाठी जात होते. दरम्यान ट्रक्टर होळेमसूती वळणावर आली असता चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक्टर रस्त्याशेजारी पलटी झाली. यामध्ये 15 पेक्षा अधिकजण जखमी झाले. यात चार जणांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना उपचारासाठी बागलकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनेक महिलांची कंबर तर अनेक पुरुषांचे पाय तुटले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच निडगुंदी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रक्टर ताब्यात घेतली असून चालकही गंभीर असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद निडगुंदी पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









