घरातच घडली घटना/ आत्महत्या केल्याचा संशय
प्रतिनिधी/ पणजी
मेरशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच प्रकाश गोपीनाथ नाईक (46) यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी 10.50 च्या सुमारास उघडकीस आली. नाईक यांच्या उजव्या बाजूच्या कानफटीत पिस्तुलाची गोळी घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नेंद केली आहे. हा आत्महत्येचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतदेह गोमेकॉत ठेवण्यात आला असून आज शनिवारी शवचिकित्सा करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक एसएमएस आपल्या मोबाई ग्रुपमध्ये पाठविला होता. त्यात त्यांनी म्हटले आहे की आपण सर्वोतोपरीने प्रयत्न केला आहे. आपली ताहीर व विल्सन गुदिनो हे सतावणूक करीत आहेत. आपल्यावर ताण असून दोघांच्या सतावणुकीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. एसएमएस मध्ये नावे नमूद केलेल्या व्यक्तींची चाकशी केली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
मोलकरीण, ड्रायव्हरची जबानी नोंद
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला. मात्र त्यावेळ मृतदेह त्या ठिकाणी नव्हता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या घरची मोलकरीण, प्रकाश नाईक यांचा ड्रायवर सलीम यांची जबानी नोंद केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात नाईक यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलवर काहीजणांना वरील एसएमएस पाठविला होता, असेही पोलिसांनी सांगितले.
मोलकरीणीला ऐकू आला ठो असा आवाज
मोलकरीणने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी प्रकाश नाईक यांची आई व बायको मंदिरात गेली होती. छोटा मुलगा शाळेत गेला होता. मोठा मुलगा मनाली येथे सहलीला गेला आहे. ड्रायवर घराच्या बाहेर होता. सकाळी 10 च्या सुमारास मोलकरीण घरात आली. ती तळमजल्यावर आपले काम करीत होती. प्रकाश नाईक हे पहिल्या मजल्यावरील आपल्या झोपण्याच्या खोलीत होते. काही वेळाने ठो असा आवाज मोलकरीणीला ऐकू आल्याने ती बाहेर आली तर तिला काही दिसले नाही म्हणून ती पुन्हा आत गेली.
जखमी प्रकाशला बहिण, भाचीने नेले इस्पितळात
काही वेळाने प्रकाश नाईक यांची बहिण व भाची धावत घरात आली. त्यांनी थेट नाईक यांच्या झोपण्याच्या खोलीत जाऊन पाहिले, तर प्रकाश नाईक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांनी त्वरित प्रकाश नाईक यांना खाजगी गाडीतून बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळ गाठले तिथे नाईक यांना मृत घोषीत करण्यात आले..
एसएमएसमुळे धावत आली बहिण, भाची
घटनेपूर्वी प्रकाशने जो एसएमएस पाठविला होता तो त्याने आपल्या बहिणीलाही पाठविला होता. तो एसएमएस बहिणीला मिळाल्याबरोबर ती धावत घरी आली आणि नाईक यांच्या झोपण्याच्या खोलीत जाईपर्यंत प्रकाश नाईक रक्ताच्या थोरोळ्यात पडलेले होते.
नाईक यांच्याकडे प्रिन्स रिचर्ड कानपूर, भारतीय बनावटीचे .320 एमके4, डी3591एम हे पिस्तूल (रिवॉल्वर) होते. 2018 साली त्याला परवानाही मिळाला होता. परवाना नंबर 4585/18/4197. त्याच पिस्तुलाने नाईक यांनी गोळी मारून घेतली होती, असावी असा पोलिसांचा कयास आहे. पोलीस घटनास्थळी पोचले तेव्हा नाईक यांना गोमेकॉत भरती केले होते. पोलिसांनी गोमेकॉत जाऊन मृतदेहाचा पंचनामा पेला. शवचिकित्सा अहवाल आल्यानंत मृत्यू कसा झाला त्याचा उलघडा होणार असून त्यानंतर पुढील तपास होणार आहे.









