उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांना दिल्या शुभेच्छा
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या कित्येक वर्षापासून अनुकंपा तत्वावरील भरती झाली नव्हती. इतर जिल्हा परिषदांमध्ये ही भरती होवूनसुद्धा साताऱयातील हा प्रश्न रखडला होता. त्यावरुन जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव यांनी सातत्याने आवाज उठवला. ‘तरुण भारत’नेही त्यास प्रसिद्धी देवून पाठपुरावा केला. जिल्हा परिषद प्रशासनाने बिंदू नामावली व ज्येष्ठता तपासून, निकष तपासून त्यांना 80 जणांना नियुक्तीपत्र दिल्याने त्यांच्या चेहऱयावर आनंद दिसत होता. ज्यांना नियुक्ती पत्र मिळाले नाही ते व नियुक्तीपत्र मिळाले त्यांनी नुकतीच भेट घेत जाधव यांचा सत्कार केला.
सातारा जिल्हा परिषदेत सध्या विविध पदांची भरती सुरु आहे. सुमारे 14 हजार इच्छुकांचे अर्ज आले आहेत. एसटी प्रवर्गातील भरती असल्याने काही इच्छुकांचे उदाहरणे फारच गमतीदार आहेत. काहींनी एसटीसाठी अर्ज केला आहे, तर एकाने चक्क मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदासाठीच अर्ज केला आहे. अनेक जणांचे अर्ज बाद होत आहेत. असे असतानाच यावर्षी रखडलेली अनुकंपा भरतीची प्रक्रियाही सुरु केली आहे. विद्यमान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांना तत्कालिन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी शेवटच्या सर्वसाधारण सभेत अनुकंपा भरतीबाबत सूचना दिल्या होत्या, त्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचा विभाग कामाला लागला. असलेल्या प्रतिक्षा यादीत जे-जे बिंदू नामावली व ज्येष्ठतेनुसार कागदपत्रे तपासणी करुन कोण कोणत्या पदासाठी बसू शकतील हे पाहून त्यांना नियुक्तीपत्र देण्याची यादी जाहीर करण्यात आली. यादी पाहून गुरुवारी जिल्हा परिषदेत वास्तविक मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या सर्व उमेदवारांनी ते नसल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांची भेट घेतली. त्यांचा सत्कार केला. त्यावेळी ज्यांची नियुक्ती झाली नाही. त्यांचीही समस्या कथन करताच त्यांच्या समस्या लगेच दूर केल्या.।़
ती एक भाग्यवान
अनुकंपाकरता 79 जण घेण्याचे नियोजन होते. तेवढय़ाच जागा होत्या, परंतु बिंदू नामावली तपासल्यानंतर एक जागा आणखी घ्यावी लागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर साताऱयातील ऐश्वर्या धोंगडे या युवतीचा नंबर लागल्याचे समजते. त्यामुळे ती एक भाग्यवान युवती म्हणूनच ओळखली जावू लागले आहे. हल्ली सरकारी नोकरीची समस्या बिकट असल्याने हा योगायोगच समजला जात आहे.।़