रांची / वृत्तसंस्था :
झारखंडच्या खूंटी येथील काला माटीमध्ये चार अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. 6 मुली मकर संक्रातीच्या दिनी रंग रोडी मेळा पाहून गावी परतत असताना आरोपींनी त्यांना रोखले होते. या घटनेवेळी 2 मुलींना पलायन करण्यास यश आले. तर 4 मुलींना दुसऱया गावी नेत आरोपींनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.
खूंटी जिल्हय़ातील हादूतामी गावात ही घटना घडली असून पीडित मुलेंचे वय 12-15 वर्षांदरम्यान आहे. या मुली पाचवी तसेच सहावीत शिकत आहेत. तीन बाईकवरून आलेल्या 6 युवकांनी या मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींपैकी एकजण मुलींच्या वर्गातच शिकत आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यावर पीडित मुलींना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठविले आहे.
घटनास्थळावरून पळून गेलेल्या दोन मुलींनी पीडितांच्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचून पीडित मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची ओळख पटविली असून पुढील कारवाईसाठी पावले उचलली आहेत.
2018 मध्येही खूंटीच्या कोचांग भागात 5 मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी 5 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपींमध्ये पत्थरगढीच्या समर्थकांचा समावेश होता.








