श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्हय़ात भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिद्दीनचा जिल्हा कमांडर हारुन हफाज याचा खात्मा झाला आहे. डोडाच्या गोंदाना परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत हारुन ठार झाला असून, त्याच्यावर यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या काही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या आरोपासह 15 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्सला हारुन डोडा परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती. गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीवरून सैन्याने गोंदानामध्ये मोठय़ा प्रमाणात तपास मोहीम हाती घेतली होती. सैन्याने केलेल्या कडक नाकाबंदीदरम्यान हारुनने गोळीबार करत घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर देत त्याचा खात्मा केला. परंतु, त्याचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला असून, सैन्याकडून त्याचा शोध सुरू आहे.









