ऑनलाइन टीम / श्रीनगर :
जम्मू काश्मीरमध्ये अति बर्फवृष्टीमुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. या कडाक्याच्या थंडीतही जवानांच्या शौर्याचे दर्शन घडले. जम्मू काश्मीरमधील 100 जवानांच्या तुकडीने तब्बल चार तास चालत गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचवले यानंतर त्या महिलेची प्रसुती झाली.
चिनार कॉर्प्सच्या भागात मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी सुरू होती. कमरेपर्यंत बर्फ साचला होता. या दरम्यान शमीमा नावाच्या गर्भवती महिलेला ताबडतोब रुग्णालयात पोहोचवण्याची गरज होती. या गावात कोणतीही वैद्यकीय सुविधा नसल्याने त्या महिलेस तत्काळ बाहेर हलवण्याची गरज होती. त्याचवेळी 100 जवान मदतीला धावून आले. व त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेले. दरम्यान, तिनं मुलाला जन्म दिला असून दोघंही सुखरूप आहेत.
जवानाच्या या कामगिरीचं पंतप्रधन नरेंद्र मोदींनी ट्विट करून कौतुक केलं आहे. ते म्हणाले, आपल्या लष्कराला शौर्य आणि माणुसकीसाठी ओळखलं जातं. जेव्हा देशवासियांना गरज असते, त्यावेळी आपलं लष्कर सर्वतोपरी मदत करतं. आपल्या लष्कराचा अभिमान वाटतो.