प्रतिनिधी/ दुशेरे, कराड
मकर संक्रांतीच्या सणासाठी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा मृतदेह घराशेजारच्याच विहिरीत आढळल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील शेरे येथे मंगळवारी उघडकीस आली. अमृता योगेश जगताप (वय 22) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. अमृताचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा तपास सुरू झाला आहे.
या प्रकरणी तानाजी धोंडिराम जाधव (वय 55 रा. विश्वासमळा, शेरे ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात खबर दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तानाजी जाधव हे कुटुंबासह शेरे येथे राहतात. त्यांचे भाऊ शिवाजी हे पत्नी व मुलांसह पुण्यात असतात. शिवाजी जाधव हे नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. त्यांची मुलगी अमृता हिचे लग्न 22 डिसेंबर 2019 रोजी झाले असून तिला वडगाव हवेली येथे दिले आहे. 15 जानेवारीला मकर संक्रातीचा सण असल्याने अमृता सणासाठी शेरे येथे मुळ गावी आली होती. मुलगी माहेरी आल्याने तिचे वडील व आई हे सुद्धा शेरे येथे घरी आले होते. मंगळवारी एका नातेवाईकांचे वर्षश्राद्ध असल्याने तानाजी जाधव, शिवाजी जाधव, संगीता जाधव हे वाठार येथे गेले होते. मुलगा अविनाश जाधव हा इस्लामपूरला कामानिमित्त गेला होता. अमृता हिच्यासह अन्य दोन महिला घरी होत्या. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अमृता घरात सापडत नसल्याचे तानाजी जाधव यांना फोनवरून समजले. कुटुंबीयांनी अमृताचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. दुपारी 2 वाजता अमृताचा मृतदेह विहिरीत दिसल्याने खळबळ उडाली. अमृताचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा तपास सुरू आहे.









