प्रतिनिधी/ खेड
रूग्णवाहिकेतून खवल्या मांजराच्या तस्करीचा आणखी एक प्रकार नवी मुंबई-कळंबोली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सातजणांच्या मुसक्या आवळल्या. दोनच दिवसांपुर्वी खवले मांजराच्या तस्करीचे खेड कनेक्शन उघड झाले असतानाच या दुसऱया कारवाईत रत्नागिरीतील दोन युवकांना अटक झाली आहे. या दोन्ही घटनांमध्ये जिल्हय़ातील कातकरी समाजाकडून खवले मांजर पुरवले गेल्याची माहितीही उघड झाली आहे.
रमेश दाते (38), सुनील दाते (42), मुकेश मोहिते (32), उमेश पवार (32, सर्व रा. पुणे), पांडुरंग चव्हाण (35) व विजय मोरे (35, दोघेही रत्नागिरी), भगवान माने (22, रा. महाबळेश्वर) अशी तस्करी करणाऱया संशयिताची नावे आहेत. पुणे येथून दोघेजण रूग्णवाहिकेच्या सहाय्याने 7 किलो 790 ग्राम वजनाचे दुर्मीळ खवले मांजर विक्रीला घेवून येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या खवल्या मांजराचा 40 लाखांना व्यवहार होणार होता, अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पनवेल-मुंब्रा बायपास रस्त्यावर सापळा रचला.
याचदरम्यान, कळंबोली वाहतूक कार्यालयाजवळील बसस्थानकावर एक संशयित रूग्णवाहिका आढळून आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी रूग्णवाहिका थांबवत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने संशय बळावला. त्यानुसार रूग्णवाहिकेची तपासणी केली असता ब्लँकेट व स्टीलच्या बॅरेलमध्ये गुंडाळलेले बेशुध्दावस्थेतील खवले मांजर आढळून आले. हे मांजर कारमधून आलेले अन्य सहाजण खरेदी करणार होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत एकाच ठिकाणाहून 7 जणांना मुद्देमालसह जेरबंद केले. पोलिसांनी बेशुध्द खवले मांजराचे प्राण वाचवून वनाधिकाऱयांच्या ताब्यात दिले. या ठिकाणी सापडलेले खवले मांजर रत्नागिरी जिल्हयातील कातकरी समाजातील लोकांकडून उपलब्ध झाल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्ह्य़ातील खांदेश्वर पोलिसांनी कल्पेश गणपत जाधव (रा. कळंबणी खुर्द-खेड) याच्या ठाणे जिह्य़ातील आसूडगाव येथे मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्याकडून 7 किलो 360 ग्रॅम वजनाचे खवले मांजर हस्तगत करण्यात आले होते. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे दुसरे रॅकेट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.









