सिडनी / वृत्तसंस्था :
ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेली भीषण आग नियंत्रित करण्यासाठी कार्यरत असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी आगीवर मोठय़ा प्रमाणावर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संकटग्रस्त भागात पावसाची शक्यता असल्याने जंगलातील आगीमुळे उद्ध्वस्त झालेल्या ग्रामीण भागांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ऑस्ट्रेलियातील वणवा संपुष्टात यावा याकरता जगभरात प्रार्थना केली जात आहे.
न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया राज्याच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीवर बऱयाच प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या राज्यांमध्ये मागील 4 महिन्यांपासून आगीचे संकट आहे. न्यू साउथ वेल्स ग्रामीण अग्निशमन सेवेचे आयुक्त शेन फिट्जसिमोंस यांनी सोमवारी या क्षेत्राचा दौरा केला आहे. काही भागांमध्ये अद्याप आगीचे संकट असले तरीही ती विझविण्याचे प्रयत्न आता यशस्वी होताना दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपाशी प्राण्यांसाठी फळभाज्यांचा वर्षाव
जंगलात अडकून पडलेल्या उपाशी प्राण्यांसाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून भाज्या तसेच फळांचा वर्षाव केला जातोय. जंगलातील आगीत सर्वाधिक नुकसान प्राणी तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासह अधिकाधिक संख्येत प्राणी, पक्षी आणि वन्य प्रजातींना वाचविण्यास प्राधान्य असल्याचे विधान पर्यावरण आणि ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.
4 महिन्यांपासून आगीचे संकट
ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली आग सातत्याने फैलावल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून हा वणवा विझवण्यासाठी बचावमेहीम राबविली जात आहे. 4 महिन्यांपासून धगधगत असलेल्या या आगीत सुमारे 50 कोटी वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहेत. आगीचा सर्वात मोठा फटका कोआला (प्राण्यांची एक प्रजात) या प्राण्याला बसला आहे. न्यू साउथ वेल्सच्या मध्य-उत्तर भागात कोआलांचे सर्वाधिक वास्तव्य आहे. जंगलातील आगीमुळे त्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.