प्रतिनिधी / येळ्ळूर :
येळ्ळूर, अवचारहट्टी-देवगणहट्टी येथील नागरिक यल्लम्मा यात्रेसाठी सौंदत्तीला गेले होते. यावेळी चोरटय़ांनी संधी साधत अवचारहट्टी आणि देवगणहट्टी या दोन्ही गावातील घरे फोडून सहा तोळे सोने, 40 हजार रोख रक्कम आणि चांदी लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. देवगणहट्टी येथे तर चोरटय़ांनी तिजोरीच घराबाहेर आणून दागिने लांबविले आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
देवगणहट्टी येथील राजू सहदेव तुक्काण्णाचे यांचे कुटुंबीय यल्लम्मा यात्रेसाठी गेले होते. घराला कुलूप लावून ते सर्व जण गेले असता चोरटय़ांनी संधी साधत घरातील तिजोरीच घराबाहेर काढली. तिजोरी फोडून 5 तोळे सोने, रोख 10 हजार आणि 5 हजार रुपयांची चांदी लांबविली. अवचारहट्टी येथील गजानन मल्लाप्पा सुळेभावी यांच्या घरातील रोख 30 हजार रुपये रोख रक्कम, 10 तोळय़ाचे चांदीचे दागिने आणि 1 तोळा सोने लंपास केले आहे.
अवचारहट्टी येथील गजानन सुळेभावी कुटुंबीयांसह यल्लम्माला गेले होते. मुलगा यल्लम्मा यात्रेहून येऊन कामासाठी कुडाळला गेला. यावेळी चोरटय़ांनी घरातील तिजोरीतील सर्व दागिने लंपास केले आहेत. या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.