प्रतिनिधी / बेळगाव :
रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित ‘रोटरी अन्नोत्सव’ ला शनिवारी उत्तम प्रतिसाद मिळाला. शाकाहारी बरोबरच खमंग मांसाहारी खाद्यपदार्थांची चव चाखता येत असल्यामुळे खवय्यांनी स्टॉलवर गर्दी केली होती. शनिवारी दुसऱयाच दिवशी बेळगावबरोबरच परिसरातील खवय्यांनी मोठी गर्दी करत खाद्यपदार्थांवर ताव मारला.
रोटरी क्लब या सामाजिक संस्थेच्यावतीने सामाजिक कार्य करण्याकरिता विविध उपक्रम राबविले जात असतात. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून असे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. अन्नोत्सवाच्या माध्यमातून जमा झालेला निधीदेखील अशाच सामाजिक उपक्रमांकरिता वापरला जातो.
सीपीएड् मैदानावर सुरू असणारा या अन्नोत्सवामध्ये विविध राज्यांमधील खाद्य संस्कृती एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी थेट दिल्ली-काश्मीरपर्यंतचे खाद्यपदार्थ या महोत्सवात आणण्यात आले आहेत. हलक्या पुलक्या पदार्थांबरोबरच खमंग चटपटीत पदार्थ खवय्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
खाद्यपदार्थांबरोबरच संगीताची मेजवानी
खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच संगीताच्या विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सदाबहार अशा जुन्या गाण्यांची व नव्या दमाच्या तडफदार गीतांची एक सुंदर मैफल गायकांनी सादर केली. या गीतांना खवय्यांनी टाळय़ांची दाद दिली. खाद्यपदार्थांच्या सोबत संगीत मेजवानीचा आनंद उपस्थित खवय्यांनी लुटला.









