ऑनलाइन टीम / पुणे :
देशाच्या सिमेवर काश्मीर, राजस्थान अशा अनेक राज्यात काम करत असताना अनेकवेळा मनात विचार यायचा की आपण लढतोय कोणासाठी? आपल्याला काही झाले, तर आपल्या कुटुंबाचे का? मात्र, पुण्यातील गणेशोत्सव मंडळे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी नेहमीच ठामपणे उभी राहिली आणि आम्ही लढाई करतो ते योग्य लोकांसाठी करतो हे दाखवून दिले. त्यामुळे सिमेवर आम्हाला मिळणारा हा पुण्यातील मंडळांचा तीळगूळ गोड आठवण करुन देणारा असतो, अशा शब्दांत लष्करांतील निवृत्त सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून पहिल्या टप्प्यातील सुमारे १०० किलो तिळगूळ देशाच्या सरहद्दीवरील सैनिकांना पाठविण्यात आले. याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
श्री काळभैरवनाथ मंडळ, पोटसुळ्या मारुती मंडळ, नवजवान मित्र मंडळ, कडबे आळी मित्र मंडळ, हनुमान व्यायाम मंदिर, अखंड हिंदुस्तान मंच, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, अकरा मारुती यांसह अनेक मंडळांनी सहभाग घेतला.
देशासाठी, लोकांसाठी, कुटुंबासाठी लढलो याचा आम्हाला अभिमान आहे. पुण्यातून जेव्हा तीळगूळ पाठविले जातात तेव्हा देशाच्या सीमेवरील जवानांना लढण्याची उर्जा आपण प्राप्त करुन देतो आणि या कार्यक्रमाच्या निम्मिताने आपण त्यांना संदेश देतो, तुम्ही एकटे नाही, तर तुमच्या मागे तुमचे लाखो लोकांचे कुटुंब आहे अशी प्रेरणा देतो, असे सैनिकांनी यावेळी सांगितले.
यावेळी निवृत्त हवालदार संजय नाळे, निवृत्त सुभेदार अशोक पाटील, निवृत्त हवालदार बजरंग निंबाळकर, सुभेदार संदीप आंग्रे तसेच मेहुणपुरा मंडळाचे उपाध्यक्ष अनंत कावणकर, पराग ठाकूर, आनंद सराफ, नेने घाट गणेशोत्सव मंडळाचे मंदार परळीकर, साईनाथ मंडळाचे पियुष शहा, सेवा मित्र मंडळाचे शिरिष मोहिते, तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडित, शाहीर हेमंत मावळे, कुमार रेणुसे, सदीप लचके, शेखर देडगावकर, डॉ. मिलिंद भोई, बाबा जसवंते आदी मान्यवर कार्यक्रमावेळी उपस्थित होते.