बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा स्थापना दिन उत्साहात
प्रतिनिधी / बेळगाव
मुले ही लहान वयातच भविष्यातील शिक्षणाची स्वप्ने बघत असतात. मुलांना स्पर्धेसाठी तयार करताना शिक्षक व पालक अधिकच आपेक्षा ठेवतात. त्यामुळे मुलांच्या मानसिक बौध्दिकतेवर परिणाम होताना दिसून येत आहेत. पाल्यांना केवळ अभ्यासात न गुंतवता सभोवतालच्या व पर्यावरणाच्या अभ्यासाकडेही वळवा. त्यामुळे पाल्यांचा सर्वांगीण विकास होण्यास वाव मिळेल, मुलांच्या बौध्दिक, मानसिक, शारीरिक वाढीसाठी शिक्षकांबरोबर पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत डॉ. आरती भंडारे यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा स्थापना दिन शुक्रवारी रेल्वे ब्रिज येथील मराठा मंदिरमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य दिलीप चिटणीस होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष आर. डी. शानभाग, सेवंतीलाल शहा, भालचंद्र कलघटगी, बिंबा नाडकर्णी, पंकज शिवलकर, प्राचार्या एच. पी. परूळेकर, जे. बी. फडके, वृंदा जिरनाळ, विनायक आजगावकर, ज्ञानेश कलघटगी उपस्थित होते.
प्रारंभी एम. व्हि. हेरवाडकर हायस्कूलच्या विद्यार्थिंनीनी स्वागतगीत सादर केले. प्राचार्या एच. पी. परूळेकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. उपस्थितांचे रोपटे व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सुनिता कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘मदुकेरीयन’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्याध्यापिका वृंदा जिनराळ यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
यावेळी दिलीप चिटणीस यांनी आपल्या अध्यक्षणीय भाषणात मुलांच्या संस्कारमय विकासासाठी मुले, शिक्षक व पालक यांच्या भूमिकेविषयी विचार व्यक्त केले. यावेळी वर्षभरात घेण्यात आलेल्या ऍथलेटिक्स, स्केटिंग, कराटे, योगा बुध्दिबळ अशा विविध स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आले. आदर्श विद्यार्थी प्रज्वल जोशी व आदर्श विद्यार्थिंनी म्हणून स्वराली देसाई यांची निवड करण्यात आली. त्यांचाही गौरव करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या सर्व शाखांच्यावतीने बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. पहिल्या ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटक, सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. सुत्रसंचालन व्हि. पी. महाजन यांनी केले तर आभार मिनाक्षी सुतार यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.









