वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियातील तीव्र वणव्यात बळी गेलेल्यांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्याकरिता आपल्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव केला असून त्याला 10 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सहून (7 लाख अमेरिकन डॉलर्स) अधिक किंमत मिळाली आहे.
फिरकीचा जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱया वॉर्नने 145 कसोटीत ही कॅप वापरली होती. कारकिर्दीत त्याने एकूण 700 हून अधिक कसोटी बळी मिळविले होते. आपली कॅप मिळविण्यासाठी बोली लावणाऱयांत मोठी चुरस लागल्याचे पाहून तोही चकित झाला होता. त्याच्या या कॅपला 10 लाख 7500 ऑस्ट्रेलियन डॉलर्सला घेतले गेले. माजी महान खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्या बॅगी ग्रीनपेक्षा वॉर्नच्या कॅपला जास्त रक्कम मिळाली आहे. 2003 मध्ये मदतनिधीसाठी ब्रॅडमन यांच्या कॅपला 4 लाख 25 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंमत मिळाली होती.
‘प्रत्येकाला मनापासून धन्यवाद. या लिलावात चुरशीने भाग घेतलात त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि ज्याने कॅप मिळविली त्याचेही मनापासून अभिनंदन. तुझ्या औदार्याने मी भारावून गेलोय. कारण एवढय़ा रकमेची मी अपेक्षाही केली नव्हती,’ असे वॉर्नने ट्विट संदेशात सांगितले. ‘जमा झालेली रक्कम रेड क्रॉसकडे सुपूर्द केली जाणार आहे. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार,’ असेही त्याने सांगितले.
कसोटी पदार्पण करताना प्रत्येक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला बॅगी ग्रीन कॅप दिली जाते. देशाचा गौरव म्हणून प्रत्येक क्रिकेटपटू ती अभिमानाने मैदानात वापरतो. ऑस्ट्रेलियात वणवा पेटून अनेकांचे बळी गेले आहेत. या आगीत किमान 26 बळी गेले असून 2000 घरे जळून नष्ट झाली आहेत. त्यांना मदत करण्यासाठी त्याने आपल्या कॅपचा लिलाव करून मिळालेली रक्कम त्यांना देण्याचा निर्णय वॉर्नने घेतला होता. अनेक क्रीडापटूंनी या कार्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला असून क्रिकेपटू ख्रिस लीन, ग्लेन मॅक्सवेल, डार्सी शॉर्ट यांनी बिग बॅशमधील सामन्यात मारलेल्या प्रत्येक षटकाराला 250 डॉलर्स देणगी देण्याचे जाहीर केले आहे. अनेक टेनिसपटूही यात सामील झाले असून जागतिक अग्रमानांकित ऍश्ले बार्टी ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत मिळविलेली बक्षीस रक्कम मदतनिधीला देण्याचे जाहीर केले. मात्र दुर्दैवाने पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली आहे. निक किर्गीओसने मायदेशात होणाऱया टेनिस मोसमातील सामन्यात प्रत्येक बिनतोड सर्व्हिसला 200 डॉलर्स देण्याचे जाहीर केले आहे. आणखी निधी जमा करण्यासाठी 15 जानेवारी रोजी प्रदर्शनीय सामने मेलबर्नमधील रॉड लेव्हर कोर्टवर होणार असून त्यात फेडरर, सेरेना विल्यम्ससारखे बडे खेळाडू सहभागी होणार आहेत.









