दिल्ली पोलिसांचा दावा, नऊ संशयितांची नावे घोषित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या आठवडय़ात येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात मुखवटाधारी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याचे नेतृत्व विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची प्रमुख आयशी घोष हिच्याकडूनच झाले होते, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. आपल्या दाव्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी काही छायाचित्रे व व्हिडिओ फुटेज प्रसिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे नऊ संशयित हल्लेखोरांची नावे घोषित केली आहेत.
देशभर गदारोळ माजविलेला हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी केला होता, असा आरोप अनेक विरोधी पक्षांनी केला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी पुराव्यानिशी केलेल्या दाव्यात वेगळीच माहिती समोर येत आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची प्रमुख आयशी घोष या हल्ल्यात रक्तबंबाळ झाली होती, असे वृत्त प्रथम देण्यात आले होते. मात्र, घोष हिनेच या हल्ल्याचे नेतृत्व करत पेरियार वसतीगृहात अनेकांना मारहाण केली होती. तसेच विशिष्ट खोल्यांमध्ये घुसून हिंसाचार घडविला होता, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नऊ संशयितांची नावे
दिल्लीचे पोलीस अधिकारी जॉय तिर्की यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. त्यांनी नऊ संशयित हल्लेखोर विद्यार्थ्यांची नावेही घोषित केली. चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, विजय वास्कर, सुचेता तालुकराज, प्रिया रंजन, डोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज आणि विकास पटेल यांना संशयित हल्लेखोर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
डाव्या संघटनांचेच सदस्य
वरील सर्व विद्यार्थी डाव्या संघटनांचेच आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. स्टुडंट्स फ्रट ऑफ इंडिया (एसएफआय), ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए) आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन (डीएसएफ) या त्या चार संघटना आहेत. हजारो विद्यार्थी शीतकालीन अभ्यासक्रमासाठी नावे नोंदवू इच्छित होते. तथापि, या संघटनांचा नावे नोंदविण्यास विरोध होता. नावे नोंदविणाऱया विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आणि त्यांना नावे नोंदविण्यापासून रोखण्याच्या हेतूने हा पूर्वनियोजित हल्ला डाव्या संघटनांनीच केला होता, असे तिर्की यांनी सांगितले.
5 जानेवारी या दिवशी घडलेल्या हल्ल्याचे सविस्तर वर्णन पोलिसांनी दिले आहे. 1 ते 4 जानेवारी या कालावधीत विद्यापीठात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या लहान मोठय़ा घटना घडल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. तथापि, विद्यार्थ्यांनी शीतकालीन अभ्यासक्रमासाठी नावे नोंदविणे थांबविले नव्हते. त्यामुळे 5 तारखेचा मोठा हल्ला करण्यात आला. पहाटे 3.45 ते 4.15 या अर्ध्या तासात 40 ते 50 मुखवटेधारी व्यक्तींनी दोन वसतीगृहातील काही खोल्यांवर हल्ले केले. याच खोल्यांमध्ये नावे नोंदवू इच्छिणारे विद्यार्थी रहात होते. विद्यार्थ्यांच्या मोर्चावर हल्ला करण्यात आला, अशा वावडय़ा उठविण्यात आल्या, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपाचा इन्कार
विद्यार्थी संघटनाप्रमुख आयशी घोष हिने पोलिसांचा दावा नाकारला आहे. आपण कोणालाही घाबरत नसल्याचे तिने म्हटले आहे. हल्ला कोणी केला याचे पुरावे आपल्याकडेही आहेत, असा दावाही तिने केला. तथापि, प्रत्यक्षात कोणताही पुरावा तिने अद्यापपावेतो प्रसिद्ध केलेला नाही.
दीपिका पदुकोनवर खोचक टिप्पणी
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात येऊन तुकडे तुकडे गँगचे समर्थन केले. असे समर्थन करण्याचा तिला अधिकार आहे, अशी खोचक टिप्पणी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. पदुकोन हिने आपल्या राजकीय नि÷ा कोणीकडे आहे हे 2011 मध्येच दाखवून दिले होते. त्यामुळे तिच्या या कृतीचे आश्चर्य वाटत नसल्याचे इराणी यांनी म्हटले आहे.









