ऑनलाईन टीम / मुंबई :
नवीन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण आज रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी दिसणार आहे. संपूर्ण भारतभरात हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण डोळ्यांना हानीकारक असणार नाही, अशी माहिती खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
सोमण म्हणाले, यावषीचे चारही चंद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण असतील. विदर्भात ग्रहणाची सुरुवात रात्री 10.37 मिनिटांनी होईल. ग्रहण मध्य 12.40 मिनिटांनी तर ग्रहण समाप्ती 2.42 मिनिटांनी होईल.
ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱया विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते. हे चंद्रग्रहण साध्या डोळय़ांनी पाहता येईल. ग्रहण साध्या डोळय़ाने फारसे चांगले दिसणार नाही. परंतु दुर्बिणी किंवा टेलिस्कोपने पृथ्वीची सावली पाहता येऊ शकेल. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या गडद छायेतून जातो. तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण घडते, पण छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो. त्यामुळे चंद्रावर गडद सावली दिसत नाही. पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसेल.