बेळगाव / प्रतिनिधी
महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून अल्प भाडे आकारण्यात येत आहे. ठराव मंजूर करूनही अनामत रक्कम घेतली नसल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेचे कोटय़वधीचे नुकसान होत असल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. याबाबत लवकरच नोटीस बजावून अनामत रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलात तसेच खुल्या जागांमध्ये 440 गाळे आहेत. या गाळेधारकांकडून अल्प भाडे आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. भाडेवाढ करण्याच्यादृष्टीने आणि अनामत रक्कम घेण्यासाठी 2014 मध्ये सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र या ठरावाची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. 354 गाळेधारकांनी 3 कोटी 11 लाख रुपयांची अनामत रक्कम भरली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काही गाळे माजी नगरसेवकांच्या नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. वाढीव भाडे आणि अनामत रक्कम वसूल करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच मनपाचे कोटय़वधीचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनामत रक्कम वसूल करण्याच्यादृष्टीने महापालिकेने यापूर्वी नोटीस बजावली होती. आता पुन्हा ही कारवाई हाती घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सर्व गाळेधारकांना पुन्हा एकदा नोटीस बजावून 7 दिवसांच्या आत अनामत रक्कम जमा करण्याची सूचना करण्यात येणार आहे. अनामत रक्कम न भरल्यास भाडे करार रद्द केला जाणार असल्याचे समजते. ही कारवाई येत्या आठ दिवसात हाती घेणार असल्याची माहिती महापालिका कार्यालयातील अधिकाऱयांकडून उपलब्ध झाली आहे. भाडेवाढ आणि अनामत रक्कम वसूल करण्यात आजी-माजी लोकप्रतिनिधींचा आक्षेप वाढत असल्याने याबाबत माहिती देण्यास कार्यालयातील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनीच याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.









