आनंद यांचे प्रतिपादन : जमखंडी लायन्स संस्थेतर्फे कार्यक्रम
वार्ताहर/ जमखंडी
सुखी व प्रामाणिक जीवन जगण्याकरिता अमृत देण्याचे सामर्थ्य केवळ शेतकऱयांत आहे, असे प्रतिपादन बेंगळूरचे सेंद्रीय कृषी मिशनचे अध्यक्ष आ. आनंद यांनी केले. जमखंडी लायन्स संस्थेच्या सुवर्ण संभ्रमानिमित्त आयोजित सेंद्रिय शेती, वनसंरक्षण व शेतकरी संगम या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
न दिसणाऱया देवतांची पूजा होते पण आपल्याला अन्न देणाऱया जमिनीची, दूध देणाऱया गोमातेच्या पूजनाचा विसर पडत आहे. तरी यांचे पूजन क्हावे, कृषी मौन व संयम यांची शिकवण देते, शेतकऱयांकडे आदरातिथ्य व उदात्त भावना असून अशा कृषी प्रधान देशात भारतीय संस्कृतीचे रक्षण व्हावे आदी विचार आ. श्री आनंद यांनी व्यक्त केले.
सरळ, सन्मान, स्वाभिमान याची शिकवण भारतीय शेतीत आहे, धर्म व कर्म नांगरधारी शेतकऱयांच्या हाती आहे, अन्नदाता शेतकऱयांचे हात दुसऱया समोर कधीही पसरू नयेत, शेतकरी सामर्थ्यशाली, समृद्ध बनण्याकरिता ऋतू आधारित शेती करून बाजारातील चढ-उतार दरांना सामोरे जावे. तसेच काही प्रमाणात फळे, चंदन आदी लागवड करावी, असा विचार रायचूर जिल्हय़ातील कविताळ येथील वनशेती करणाऱया कविता मिश्रा यांनी व्यक्त केला.
शेतीने मानव संस्कृतीचा प्रारंभ झाला असून शेतकरी हा ऋषी व देवता सामान आहे. निसर्गाच्या पूरक व सानिध्यात राहून शेती केल्यास त्याच्या एवढे समाधान अन्य कशात नाही, असा विचार कोल्हापूर कणेरी मठाचे श्री मुप्पीनकाड सिद्धेश्वर महास्वामीनी व्यक्त केला. वाढत असलेली जनसंख्या व अधिक उत्पादन करण्याची आशा यामुळे शेतीचा ऱहास होत असल्याबद्दल खेद व्यक्त करून नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला तरी शेतीला पोषक असावा व शेतकऱयाने आत्मविश्वासाने शेती करून विविध प्रकारची पिके घ्यावीत, असा संदेश स्वामीजींनी दिला.
त्याचप्रमाणे प्रभूलिंग साखर कारखान्याचे अध्यक्ष जगदीश गुडगुंटी यांनी विचार व्यक्त केले. लायन्स अध्यक्ष सुनील मुरगोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. एच. जी. दड्डी, मनीष भुतडा, राजशेखर अक्की, अशोक जीनीमनी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रो. बी. के. कोण्णूर यांनी तर सूत्रसंचालन एस. एम. जत्ती, डॉ. एम. पी. तानप्पगोळ यांनी केले. डॉ. एच. जी. दड्डी यांच्या छायाचित्रांचे व जमखंडीतील चित्रकलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन बसव भवन परिसरात भरविण्यात आले. जी. एस. न्यामगौड, काडू माळी, आर. एस. अक्की आदी उपस्थित होते.








