ऑनलाईन टीम / पुणे :
प्लॅस्टिक पुनर्वापराच्या संदर्भातील नियमांमध्ये प्रचंड क्लिष्टता असल्याने लघुउद्योजक या व्यवसायाकडे येण्यास धजावतत नाहीत. प्लॅस्टिकला पूर्णतः म्हणजे शंभर टक्के पर्याय दिल्याशिवाय प्लॅस्टिक बंदी म्हणजे केवळ कल्पनेतच आहे, असे मत प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ रुद्र एन्व्हार्न्मेन्टल सोल्युशनच्या संचालिका मेधा ताडपत्रीकर यांनी व्यक्त केले.
१४ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या विषयावर मेधा ताडपत्रीकर यांच्या विशेष वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया चित्राव उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या की, प्लॅस्टिकचे रिसायकलिंग आणि त्याची गुणवत्ता तपासून पाहिली पाहिजे. पाश्चात्य देशांमध्ये सिमेंट निर्मिती किंवा रस्त्यांची निर्मिती अशा विविध कामांमध्ये प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भारतीय समाजात देखील प्लॅस्टिकच्या प्रदूषणाबाबत ब-याच प्रमाणात जागरूकता झालेली आहे. समुद्रामध्ये जमा होणा-या प्लॅस्टिकची मोठी समस्या सध्या निर्माण झाली असून असे म्हटले जाते की, 2050 मध्ये समुद्रात जेवढे मासे असतील त्याच्या पेक्षा जास्त प्रमाणात प्लॅस्टिक आढळून येईल. समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणामुळे अनेक समुद्रीय जीव नष्ट होत आहेत. अनेक दुर्मिळ प्रजाती उध्वस्त होत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारे सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्याची स्तुत्य पावले उचलली जात आहेत. आमच्या संस्थेतर्फे दररोज 50 ते 52 भागांमध्ये फिरून प्लॅस्टिक गोळा केले जाते. प्लॅस्टिक गोळा करणे, त्याची वर्गवारी करणे आणि त्यावर पुढील प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी ते योग्य करणे यात मूळ अडथळे आहेत. त्यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे. आमच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत सध्या घरोघरी जाऊन प्लॅस्टिक गोळा केले जाते. आता ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांमधूनही प्लॅस्टिक गोळा करण्यासंदर्भात विचारणा होत आहे. अगदी कुरिअरच्या माध्यमातून देखील आमच्यापर्यंत प्लॅस्टिक येत आहे.









