20 जणांच्या हत्येचा फुलनदेवींवर आरोप
वृत्तसंस्था/ कानपूर
कानपूरमधील बेहमई गावात 39 वर्षांपूर्वी झालेल्या 20 जणांच्या हत्येप्रकरणी 18 जानेवारी रोजी निर्णय दिला जाणार आहे. 14 फेब्रुवारी 1981 रोजी फुलन देवी यांनी 35 सहकाऱयांच्या मदतीने 20 जणांची हत्या केली होती. याप्रकरणी फुलन देवी मुख्य आरोपी होत्या, पण मृत्यू झाल्याने त्यांचे नाव हटविण्यात आले आहे.
फुलन देवी यांनी 1983 मध्ये आत्मसमर्पण केले होते. 1993 मध्ये तुरुंगातून बाहेर पडल्यावर फुलन देवी यांनी मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा विजय मिळविला होता. 2001 मध्ये शेरसिंग राणाने त्यांची हत्या केली होती.
फुलन यांच्या वडिलाच्या भूखंडावर मैयाराम यांनी कब्जा केला होता. फुलन यांनी मैयाराम यांच्याकडे जमीन परत करण्याची मागणी केली होती. या घटनेनंतर फुलनदेवींच्या विरोधात दरोडय़ाची तक्रार मैयाराम यांनी दाखल केली होती. तुरुंगवास भोगत असताना फुलन यांचा दरोडेखोरांशी संपर्क झाला. दुसऱया टोळीच्या गुंडांनी फुलन यांच्यावर सामूहिक बलात्कारही केले. या सर्वांचा सूड उगविण्यासाठी फुलन यांनी बेहमई येथे सामूहिक हत्या घडवून आणली होती.