भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मानवतेच्या आधारावर सरकारने नागरीकत्व सुधारणा कायदा संमत केला आहे. मात्र विरोधी पक्षांना केवळ देशात दंगली घडवायच्या आहेत. समाजविरोधी तत्वांना त्यांची फूस आहे. हीच तत्वे या कायद्याविरोधात हिंसाचार माजवीत असून राहुल गांधी व प्रियांका गांधी हे या हिंसाचारासाठी जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. ते रविवारी येथे मतदानकेंद्रनिहाय कार्यकर्त्यांच्या सभेत बोलत होते.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगला देशमधून धार्मिक अत्याचारांना कंटाळून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि फारसी अल्पसंख्याकांना 5 वर्षांमध्ये भारताचे नागरीकत्व देण्याची सुविधा असणारा कायदा भारताच्या संसदेने संमत केला आहे. मात्र हा कायदा घटनाविरोधी असल्याचे कारण पुढे करत विरोधकांनी त्याला विरोध सुरू केला आहे.
काही विद्यापीठांमध्ये ही विद्यार्थी संघटनांनी या कायद्याला विरोध करण्यासाठी मोर्चे काढले होते. तर मुस्लीम समाजाने देशात अनेक शहरांमध्ये आंदोलने व मोर्चे यांच्या साहाय्याने कायद्याला विरोध चालविला आहे. मात्र या मुद्दय़ावर तसूभरही मागे हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती अमित शहा यांनी केली आहे.
जनतेचे प्रबोधन करावे
दिल्लीची विधानसभा निवडणूक आता जवळ आली आहे. कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क साधून या कायद्यासंबंधी सरकारची भूमिका स्पष्ट करावी. जनतेचे प्रबोधन करावे. हा कायदा भारतात असणाऱया जनतेवर कोणताही परिणाम करणार नाही. कोणाचेही नागरीकत्व या कायद्यामुळे हिरावले जाणार नाही. मात्र काही शेजारील देशांमध्ये अन्याय सहन करणाऱया अल्पसंख्य समाजाला यामुळे न्याय मिळणार आहे, हे जनतेला पटवून द्यावे असे आवाहन अमित शहा यांनी केले.









