चार प्रवाशी करू शकणार प्रवास ; नाशिकच्या पीडीआरएल कंपनीचे संशोधन
मुंबई / प्रतिनिधी
मोठय़ा शहरांमध्ये वाहतूक कोंडी हा प्रवाशांना त्रास देणारा खूप मोठा प्रश्न आहे. मात्र, नाशिकच्या पीडीआरएल कंपनीने वाहतूक कोंडीवर तोडगा काढला आहे. कोणत्याही धावपट्टीची आवश्यकता नसणारी देशातील पहिली एअर टॅक्सी या कंपनीने तयार केली आहे. चार माणसांना घेऊन जाणारी ही एअर टॅक्सी आयआयटी टेकफेस्टमध्ये सादर करण्यात आली आहे. ही टॅक्सी जमिनीवर किंवा गच्चीवरदेखील उतरविता येणार आहे. त्यामुळे भविष्यात एअर टॅक्सीने प्रवास करण्याचा योग मुंबईकरांना येऊ शकतो.
गाडय़ांची वाढती संख्या, रस्त्यांची सुरू असलेली कामे यामुळे सध्या सर्व महत्त्वाच्या शहरांमधील नागरिकांना वाहतूककोंडीच्या समस्येचा सामना करावा लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ, पैसा व पेट्रोल मोठय़ा प्रमाणात वाया जात असल्याने आर्थिक, मानसिक ताण सहन करावा लागतो. परंतु, आता या सर्वच समस्यांपासून नागरिकांची सुटका होणार आहे. वाहतूककोंडीतून सहज मार्ग काढता यावा यासाठी नाशिकमधील तरुणांनी पूर्णत: भारतीय बनावटीची एअर टॅक्सी बनवली आहे. नाशिकमधील सहाजणांनी एकत्र येऊन हवेतून उडणारी टॅक्सी बनवली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची असलेल्या या टॅक्सीसाठी आवश्यक चाचण्या सध्या सुरू असून, आगामी दोन ते तीन वर्षात ही वापरासाठी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सौरभ जोशी म्हणाले.
मोठय़ा शहरांमध्ये निर्माण झालेल्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी नाशिकमधील सहाजण एकत्र आले आणि त्यांनी एअरटॅक्सीचा शोध लावला. चार आसनी असलेली ही टॅक्सी ताशी 120 किमी या वेगाने प्रवास करते. त्यामुळे सध्या लागणाऱया एक ते दीड तासांचा प्रवास हा अवघ्या 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. या प्रवासासाठी सध्या साधारण टॅक्सी किंवा खासगी टॅक्सीसाठी किमान 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. मात्र, या एअर टॅक्सीमुळे प्रवाशांना फक्त 50 ते 75 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा परवडण्याबरोबरच वाहतूककोंडीपासूनही एअर टॅक्सीमुळे सुटका होणार असल्याचे सौरभ जोशी म्हणाले.









