वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा युवा टेबल टेनिसपटू मानव ठक्करने 21 वर्षाखालील वयोगटाच्या जागतिक क्रमवारीत नऊ स्थानांची झेप घेत पहिले स्थान पटकावले आहे. आयटीटीएफने गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या मानांकनात त्याने ही मजल मारली आहे.
19 वर्षीय मानव ठक्करने गेल्या महिन्यात कॅनडातील मार्खम येथे झालेल्या 21 वर्षाखालील वयोगटाच्या आयटीटीएफ चॅलेंज प्लस बेनेमॅक्स व्हर्गो नॉर्थ अमेरिकन ओपन स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकावत ही मजल मारली आहे. अंतिम फेरीत तयाने अर्जेन्टिनाच्या मार्टिन बेन्टॅन्करचा 11-3, 11-5, 11-6 असा पराभव करून अजिंक्यपद मिळविले होते. अग्रस्थान पटकावणारा भारताचा तो चौथा टेटेपटू असून याआधी हरमीत देसाई, जी.साथियान, सौम्यजित घोष यांनी हा पराक्रम केला आहे. 18 वर्षाखालील वयोगटातही तो फेब्रुवारी 2018 मध्ये जागतिक अग्रमानांकित बनला होता. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. त्या संघातही मानव ठक्करचा समावेश होता.
अन्य भारतीयांत जी. साथियानने वरिष्ठांच्या विभागात 30 वे स्थान कायम राखले आहे तर अचंता शरथ कमलने एका स्थानाची प्रगती करीत 33 वे स्थान मिळविले आहे. महिलांमध्ये मनिका बात्रा 61 व्या स्थानावरच स्थिर राहिली आहे.









