वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
आयसीसीच्या सर्व क्रिकेट स्पर्धा जिंकण्याची क्षमता भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱया विराट कोहलीच्या टीम इंडियाकडे निश्चितच असल्याचा विश्वास विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये आपला 400 धावांचा आजवर अबाधित राहिलेला विक्रम विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा मोडू शकतील, असेही प्रतिपादन लाराने केले आहे.
या वर्षांच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल होईल. अलिकडेच्या कालावधीत आयसीसीच्या विविध स्पर्धामध्ये भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत उपांत्य किंवा अंतिम फेरीतपर्यंत मजल मारली आहे. 2013 साली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे अजिंक्यपद धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पटकावेले होते.
भारतीय संघातील खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा निश्चितच सुधारला असून कर्णधार कोहलीला संघातील इतर खेळाडूंकडून मिळत असलेली साथ पाहिली तर भारतीय संघाकडे आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याची क्षमता दिसून येते, असे लाराने म्हटले आहे. 2004 साली ब्रायन लाराने इंग्लंडविरूद्ध कसोटी सामन्यात एका डावात 400 धावांची विक्रमी खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येतो. जगातील महान क्रिकेटपटूंच्या यादीत स्टीव्ह स्मिथचा निश्तिच समावेश असला तरी त्याला या क्रमांकावर फलंदाजी करणे थोडे अवघड जात असल्याचे दिसून येते. मात्र विराट कोहली प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर तसेच भारताचा रोहित शर्मा हे दर्जेदार फलंदाज असून त्यांच्याकडे आक्रमक फटकेबाजीची कला अवगत असल्याने भविष्य काळात हे फलंदाज कसोटीतील माझा 400 धावांचा विक्रम मोडू शकतील, असे प्रतिपादन लाराने केले आहे.









