कनिष्ठ स्तरावर वयघोटाळा केल्यावरून कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा युवा डावखुरा सलामीवीर मनज्योत कालरा याच्यावर डीडीसीए लोकायुक्तानी एका वर्षासाठी रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यावर बंदी घातली आहे. मागील यू-19 विश्वचषक स्पर्धेत त्याने अंतिम फेरीत शतक नोंदवले होते. यू-16 व यू-19 च्या काळात त्याने वयाच्या बाबतीत फसवणूक केल्याचे आढळल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मात्र हाच अपराध केलेल्या दिल्लीच्या वरिष्ठ संघाचा उपकर्णधार नितिश राणाला तूर्तास सोडून देण्यात आले आहे. त्याच्या कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू असून कनिष्ठ स्तरावर असताना वयाचा घोटाळा केल्याचे आढळल्यास त्याच्यावरही कारवाई होऊ शकते. आणखी एक यू-19 स्टार खेळाडू शिवम मावीचे प्रकरण बीसीसीआयकडे सोपविण्यात आले आहे. तो सध्या उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ संघातून खेळत आहे. डीडीसीएचे मावळते लोकायुक्त न्या. बद्र दुरेझ अहम यांनी आपल्या कार्यकालाच्या शेवटच्या दिवशी कालराला दोन वर्षासाठी वयोगटाच्या स्पर्धेत तसेच या मोसमात रणजी करंडक स्पर्धेत न खेळण्याचा आदेश दिला.
बीसीसीआयकडे असलेल्या नोंदीनुसार मनज्योतचे सध्याचे वय 20 वर्षे 351 दिवसांचे आहे. गेल्या आठवडय़ात दिल्लीच्या यू-23 संघातून बंगाविरुद्ध खेळला. त्यात त्याने 80 धावा जमविल्या. रणजी करंडक सामन्यातही शिखर धवनच्या जागी तो संघात येण्याच्या मार्गावर होता. पण त्याच्यावर आता कारवाई झाली असल्याने तो रणजी स्पर्धेत खेळू शकणार नाही. ‘नितिश राणाने जो अपराध केला तोच मनज्योतनेही केला. पण त्याला शिक्षा करण्यात आली याचे मलाही आश्चर्य वाटते. हा लोकायुक्तांचा आदेश असल्याने आम्ही काही करू शकत नाही. त्याच्यावर बंदी घातल्याने आम्ही त्याला रणजीसाठी निवडू शकलो नाही,’ असे डीडीसीएचे सरचिटणीस विनोद तिहारा यांनी सांगितले.
मोहालीत होणाऱया पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्ली संघात वैभव कांदपाल व गोलंदाज अष्टपैलू सिद्धांत शर्मा यांची शिखर धवन व इशांत शर्मा यांच्या जागी निवड करण्यात आली आहे.









